सोलापूर : एका स्पेलिंगची चूक थांबवू शकते शिक्षकांचा पगार
By शीतलकुमार कांबळे | Updated: March 20, 2023 12:28 IST2023-03-20T12:24:59+5:302023-03-20T12:28:10+5:30
विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपलोड होईना, ३१ मार्च अखेरची मुदत

सोलापूर : एका स्पेलिंगची चूक थांबवू शकते शिक्षकांचा पगार
सोलापूर : शासन निर्णयानुसार 31 मार्चपर्यंत आधार क्रमांक पडताळणी झालेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षकांनाच अनुदान वितरणाचे होणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपलोड करताना अडचणी येत आहे. आधारकार्ड अपलोड करुन माहिती भरत असताना एक जरी स्पेलींग मिस्टेक झाली तर शिक्षकांचा पगार थांबला जाण्याची शक्यता आहे.
६ फेब्रुवारी २०२३ च्या शासननिर्णयानुसार अनुदानास पात्र व वाढीव टप्पा अनूदानासाठी जवळपास ८० प्राथमिक शाळा पात्र आहेत. ३५० शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे. या शाळांना २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार आधार क्रमांक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी संख्येच्या आधारे पात्र शिक्षकांनाच अनुदान वितरणाचे आदेश देण्यात आले आहेत.
सरल पोर्टलवरील विद्यार्थी संख्या ग्राह्य मानुन त्यानूसार मान्य पदांना ऑफलाईन पद्धतीने वेतन अनुदान वितरीत करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
निधी परत जाण्याची शक्यता ?
आधार कार्ड अपलोड करताना सर्व्हर डाऊन ,व्हॅलिड-इनव्हॅलिड या अडचणींना येत आहेत. आधार क्रमांकाची पडताळणी पूर्ण करुन संचमान्यता, त्रुटीपात्र व अघोषित शाळांतील कर्मचार्यांचे शालार्थ आयडी मिळण्यास विलंब होणार आहे. ही प्रक्रीया वेळखाऊ असल्याने ३१ मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शासनाने मंजुर केलेला निधी परत जाण्याची शक्यता आहे.