सोलापूर : हुतात्मा चौकात तरुणावर कोयत्यानं वार करुन खुनी हल्ला
By विलास जळकोटकर | Updated: June 1, 2023 05:21 IST2023-06-01T05:21:38+5:302023-06-01T05:21:54+5:30
रात्री ११ वाजता घडला प्रकार, भावानं दाखल केलं रुग्णायात

सोलापूर : हुतात्मा चौकात तरुणावर कोयत्यानं वार करुन खुनी हल्ला
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती मिरवणुकीनिमित्त शहरात एकीकडे जल्लोष सुरु असताना हुतात्मा चौकात बुधवारी रात्री ११ वाजता एका तरुणावर कोयत्यानं वार करुन खुनी हल्ला झाल्याचा प्रकार घडला. केतन विजय माने (वय -२३, रा. हत्तुरे वस्ती, विमानतळ, सोलापूर) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.
यातील जखमी केतन माने हा तरुण हुतात्मा चौकात थांबलेला होता. मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या लोकांची हुतात्मा चौकात रहदारी होती. यावेळी काही कारण नसताना ऋषी हराळे, प्रवीण हराळे, विशाल खिलारी, समर्थ जाधव या चौघांनी कोयत्यानं केतनवर वार केला, अशी सिव्हील चौकीतील एमएलसी रजिस्टरला नोंद झाली आहे. यात त्याच्या डोक्याला मार लागून त्याचं डोकं रक्तबंबाळ झाले. तातडीने त्याला त्याचा भाऊ शुभम याने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
शासकीय रुग्णालयात एकच गर्दी
पार्क चौकात ही घटना घडताच नेमके काय झाले याची कोणालाच कल्पना नसल्यामुळे खून झाल्याची अफवा पसरली. जखमी केतनला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर शासकीय रुग्णालयात एकच गर्दी झाली होती. नेमका प्रकार कशामुळे घडला याचा पोलीस शोध घेत आहेत.