इंद्रभवनाच्या सत्तेसाठी आजपासून रणसंग्राम; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहा दिवस हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 11:12 IST2025-12-23T11:11:40+5:302025-12-23T11:12:46+5:30
नॉर्थकोट प्रशासनाची तयारी पूर्ण : एकूण सात निवडणूक कार्यालये, अर्ज दाखल करायला येणाऱ्या उमेदवारांसाठी रेड कार्पेट

इंद्रभवनाच्या सत्तेसाठी आजपासून रणसंग्राम; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहा दिवस हाती
सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी नॉर्थकोट प्रशालेच्या आवारात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार, २३ डिसेंबरपासून सुरू होत आहे. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीन दोन सुटीचे दिवस वगळता अर्ज भरण्यासाठी सहा दिवस मिळणार आहेत. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी नॉर्थकोट प्रशालेत प्रभागनिहाय सात निवडणूक कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे.
२६ महापालिकेच्या एकूण प्रभागातील १०२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या प्रभागातील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अ, ब, क, ड या गटानुसार भरून घेतले जाणार आहेत. नॉर्थकोट प्रशालेत प्रभागनिहाय सात निवडणूक कार्यालयात हे अर्ज भरावे लागतील.
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
दरम्यान, नॉर्थकोट प्रशालेत सात निवडणूक कार्यालयांसह एक आचारसंहिता कक्ष तयार करण्यात आला आहे. मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे यांनी या कक्षांची पाहणी केली. उमेदवारांना नॉर्थकोट प्रशालेच्या बाहेरच आपली वाहने आणि कार्यकर्त्यांना थांबवून अर्ज भरण्यासाठी यावे लागणार आहेत.
नियोजन चुकल्याची चर्चा
महापालिका प्रशासनाने एकाच आवारात निवडणूक कार्यालये आणि नाहरकत प्रमाणपत्रे घेण्यासाठी एक खिडकीचे कार्यालय सुरू केले आहे. त्यामुळे या आवारात एकाचवेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणारे उमेदवार आणि इच्छुक उमेदवार यांची गर्दी होणार आहे. प्रशासनाने नाहरकत प्रमाणपत्रे देण्यासाठी महापालिकेच्या आवारात कार्यालय सुरू करणे आवश्यक होते. त्यामुळे नियोजन चुकले की काय, याची चर्चा सुरू होती.
स्वीकारण्याचा कालावधी
२३ ते ३० डिसेंबर या कालावधीत २५ आणि २८ डिसेंबर रोजी सुटी असेल. उर्वरित दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील.
शेवटची तारीख, छाननी या दिवशी होणार
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर आहे. ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ३ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ३ आहे.
निवडणूक चिन्हांचे वाटप ३ जानेवारी रोजी होणार आहे. याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
१९ पानांच्या उमेदवारी अर्जात १६ पानांचे शपथपत्र
महापालिकेसाठी उमेदवारांना १९ पानांचा उमेदवारी अर्ज भरावा लागेल. पहिल्या चार पानांवर उमेदवाराचे संपूर्ण नाव, प्रभाग क्रमांक, जागा क्रमांक, राखीव प्रवर्ग, वैयक्तिक माहिती आणि उमेदवाराचा मतदार यादीतील तपशील, सूचक अनुमोदकाची माहिती आणि सही आदी माहिती भरावी लागेल.
शपथपत्रामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती. १२ सप्टेंबर २००१ नंतर दोनपेक्षा जास्त अपत्ये नसल्याची माहिती द्यावी लागेल. अन्यथा हा उमेदवार अपात्र होऊ शकतो. उमेदवारावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची आणि न्यायालयीन दाव्यांची माहिती जोडणे बंधनकारक आहे.
एक खिडकी कक्षाचे प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतर
महापालिकेच्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवार आणि नागरिकांना निवडणूक विषयक सेवा, नाहरकत प्रमाणपत्रे देण्यासाठी नॉर्थकोट प्रशालेत एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला होता. हा कक्ष मंगळवार, २३ डिसेंबरपासून प्रशासकीय इमारतीच्या आवारात स्थलांतरित करण्यात आला आहे.
मनपाच्या एक खिडकी कक्षातून उमेदवारांना २ उमेदवारी अर्ज, विविध ना-हरकत प्रमाणपत्रे, निवडणूक विषयक माहिती, अर्ज स्वीकृती तसेच इतर आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नॉर्थकोट प्रशालेत निवडणूक कार्यालये आहेत. या निवडणूक कार्यालयाच्या शेजारीच एक खिडकी कक्ष होता. यातून उमेदवारी अर्ज भरायला येणारे उमेदवार आणि इच्छुक उमेदवार यांची गर्दी होणार होती. त्यामुळे प्रशासनान अखेर सोमवारी हा कक्ष प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित केला आहे.