राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहेत. प्रचारसभा सुरू असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत, काल वंचित बहुजन आघाडीची सोलापूरात सभा झाली. यावेळी सुजात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे निवडणुकीनंतर भाजपासोबत जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला.
सोलापुरातून वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनपा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार असून, प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झाल्याचा दावा सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
आपल्या विरोधात भाजप आहे आणि आरएसएस जर निवडणूक लढवत असती, तर त्यांनाही तिकडेच हरवले असते. आपल्या विरोधात एकीकडे भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूलाही भाजपच आहे, कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात. हे सर्वांनाच माहीत आहे. या निवडणुकीच्या आधी प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या. ऑक्टोबर महिन्यातच त्या प्रवेश करणार होत्या, असेही आंबेडकर म्हणाले.
मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले की, “थांबा, तीन महत्त्वाच्या निवडणुका येत आहेत . नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका. या निवडणुका होईपर्यंत तुम्ही काँग्रेसमध्येच थांबा आणि सेटिंग करून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा. त्यानंतर प्रणिती ताई काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी प्रणिती ताई आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झालेली आहे, असंही आंबेडकर म्हणाले.
"जर तुम्हाला भाजपला सत्तेतून दूर करायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय आहे. यांची भाजपसोबतची नाती खूप आतपर्यंत आहेत. दोन ते तीन महिन्यांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफ यांच्या लग्नात शरद पवार, गौतम अदाणी आणि देवेंद्र फडणवीस हे तीनही नेते प्रमुख पाहुणे होते. हे भाजप आणि काँग्रेस समोरासमोर ईव्हीएमवर आणि रस्त्यावर लढत असल्याचे नाटक करतात, असा टोलाही सुजात आंबेडकर यांनी लगावला.
आंबेडकर म्हणाले, यांचे बिझनेस एक, यांची लग्ने एक, यांची नातीगोती एक, यांचे धंदे एक आणि प्रणिती ताईंनी प्रवेश घेतला की यांचा पक्षसुद्धा एकच असेल. म्हणून काँग्रेसच्या नादाला लागू नका. तुम्ही काँग्रेसला मत दिले, म्हणजेच भाजपला मत दिल्यासारखेच होईल. हे मी संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेसबद्दल बोलत नाही, तर सोलापूरबद्दल बोलत आहे. कारण सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार भाजपसाठी काम करतात, हे अख्ख्या जगाला कळून चुकले आहे, असा निशाणा सुजात आंबेडकर यांनी लगावला.
Web Summary : Sujat Ambedkar alleges Praniti Shinde will join BJP post-election, claiming a deal with Fadnavis. He accuses her of working for BJP's victory in Solapur, suggesting a deeper alliance between Congress and BJP in the region.
Web Summary : सुजात आंबेडकर का आरोप है कि प्रणीति शिंदे चुनाव के बाद भाजपा में शामिल होंगी, फडणवीस के साथ एक समझौते का दावा किया। उन्होंने सोलापुर में भाजपा की जीत के लिए काम करने का आरोप लगाया, जिससे क्षेत्र में कांग्रेस और भाजपा के बीच गहरे गठबंधन का संकेत मिलता है।