सोलापूर : सोलापूर-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस ही १६ ऐवजी २० डब्यांची होणार आहे. चार डबे वाढणार असल्याने ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार असून, ही सेवा २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे सोलापुरातून मुंबई व पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांना वेटिंग राहणार नाही.
सोलापूर-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस (२२२२६) ही १० फेब्रुवारी २०२३ रोजी चालू झाली. दिवसेंदिवस या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. ही गाडी आता मुंबईतून पुढे नाशिकरोड, मनमाड, संभाजीनगर, जालना, नांदेड येथे जाणार आहे. नांदेडवरून येणारी वंदे भारत ती मुंबईतून पुढे सोलापूरला येणार आहे. त्यामुळे शहरांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने सोलापूर-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसला चार डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस (२२२२५) ही २८ ऑगस्ट; तर सोलापूर-सीएसएमटी मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस (क्र. २२२२६) ही २९ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.
सुधारित कोच रचना २० कोचमध्ये २ एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये ५२ आसनक्षमता आहे, तर १६ चेअर कारमध्ये ७८ आसनक्षमता आहे. लोको पायलट आणि गार्ड केबिनच्या शेजारी असलेल्या २ चेअर कारमध्ये ४४ आसनक्षमता आहे. रेल्वेची एकूण आसनक्षमता १ हजार ४४० झाली आहे.
प्रशासनाने देशाच्या प्रतिष्ठित वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या नवीन सुविधेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा. आपला रेल्वेचा प्रवास सुकर करावा. योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक
सोलापुरातून मुंबई, पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांना सिद्धेश्वर एक्स्प्रेस व हुतात्मा एक्स्प्रेसमध्ये वेटिंग करावे लागत होते. शिवाय कामानिमित्त निघालेल्या प्रवाशांना खात्रीचे तिकीट मिळेल. संजय पाटील, अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ