सोलापूर महापूर, २९ गावं पुराच्या पाण्यात अडकलेली; भारतीय सैन्य व एनडीआरएफचे पथकाकडून बचावकार्य
By आप्पासाहेब पाटील | Updated: September 23, 2025 17:56 IST2025-09-23T17:55:54+5:302025-09-23T17:56:38+5:30
जिल्ह्यातील २९ गावांना पुराच्या पाण्यानं वेढा घातल्याची माहिती आता समोर आली आहे.

सोलापूर महापूर, २९ गावं पुराच्या पाण्यात अडकलेली; भारतीय सैन्य व एनडीआरएफचे पथकाकडून बचावकार्य
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना कोळेगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्प तसेच भोगावती नदीमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी सीना नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील २९ गावांना पुराच्या पाण्यानं वेढा घातल्याची माहिती आता समोर आली आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील शिंगेवाडी, पिठापूर, वाघेगव्हाण, मुंगशी, लव्हे, तांदुळवाडी, दारफळ, राहुल नगर, सुलतानपूर, केवड, वाकाव, खैराव, कुंभेज, आवारपिंपरी, कपिलापुरी, बोपळे, पासलेवाडी, एकरूखे, मलिकपेठ, खरकटने, कोळेगांव, आष्टे, घाटणे, शिरापूर, पिरटाकळी, शिंगोली, तरटगांव, शिवणी, अकोले, विरवटे ही २९ गावे पुरामध्ये अडकलेली आहेत.
सिना नदीकाठाच्या परिसरात १२९ गावे असून या अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सेालापूर, मोहोळ, माढा, परंडा, करमाळा तालुक्यात पुराचे पाणी मोठया प्रमाणात पसरत आहे. भारतीय हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून उत्तर सोलापूर (ग्रामीण), माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी व मंद्रुप (दक्षिण सोलापूर) तालुक्यांमध्ये पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी तातडीने शोध व बचाव कार्यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे.