- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : अक्कलकोट एमआयडीसी येथील सेंट्रल टेक्स्टाईल कंपनी मध्ये आग लागली. या आगीत आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणखीही काही लोक आतमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी अग्निशामन दलाच्या १० ते १२ वाहने आगेवर नियंत्रण मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे.
दरम्यान, पहाटे तीन ते पावणेचार च्या दरम्यान आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत सोलापूर महापालिकेचे चीफ फायर ऑफिसर राकेश साळुंखे व एक फायर कर्मचारी आगेवर नियंत्रण मिळवताना अंशतः भाजल्याचे कळत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे, आगीचे कारण अजून पर्यंत समजले नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अग्निशामक दलाचे प्रमुख राकेश साळुंखे यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी व महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.