सोलापूर जिल्ह्याचा यंदाचा निकाल ९२.८३ टक्के; शेकडो शाळांनी जपली १०० टक्क्यांची परंपरा कायम
By आप्पासाहेब पाटील | Updated: May 13, 2025 16:32 IST2025-05-13T16:32:38+5:302025-05-13T16:32:56+5:30
सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९२.८३ टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी निकालाच्या टक्केवारीत घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर जिल्ह्याचा यंदाचा निकाल ९२.८३ टक्के; शेकडो शाळांनी जपली १०० टक्क्यांची परंपरा कायम
सोलापूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल मंगळवार १३ मे २०२५ रोजी रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला. सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९२.८३ टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी निकालाच्या टक्केवारीत घसरण झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी दहावीचा निकाल ९५.८३ टक्के लागला होता. दहावी परीक्षेत दरवर्षीप्रमाणे मुलीच वरचढ ठरल्या आहेत. मुलींची टक्केवारी ९६.१० तर मुलांची टक्केवारी ९०.०४ टक्के एवढी आहे.
दरम्यान, दहावी परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातून ६४ हजार ४५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६३ हजार ८४९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, त्यापैकी ५९ हजार २७७ विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी दरवर्षीप्रमाणे आम्ही मुलांपेक्षा सरस असल्याचे पुन्हा सिद्ध करून दाखविले आहे. आज सकाळपासूनच दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी, पालक व शाळांमध्ये उत्सुकता होती. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांनी पालकांच्या मोबाईलवर, शाळेतील संगणकावर व आई-बाबांच्या कार्यालयात ऑनलाइन निकाल पाहिला. उत्तीर्ण झाल्यानंतर मुला-मुलींनी आनंद व्यक्त करीत एकच जल्लोष केला. सायंकाळी चारनंतर शहर व जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले.
अशी आहे टक्केवारी...
एकूण उत्तीर्ण : ९२.८३
उत्तीर्ण मुले : ९०.०४
उत्तीर्ण मुली : ९६.१०