मंदिरातून घरी जाताना महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सोलापुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 15:41 IST2022-03-22T15:41:23+5:302022-03-22T15:41:29+5:30
अयोध्यानगरातील घटना : फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मंदिरातून घरी जाताना महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सोलापुरातील घटना
सोलापूर : देवदर्शन करून घरी जात असताना, अयोध्यानगरातील बलदवा यांच्या घरासमोर पाठीमागून आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना सोमवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.
वर्षा राजेंद्र सोमाणी (वय ५७ रा.नाकोडा रेसिडेन्सी झंवर मळा, जुना पुना नाका) या द्वारकाधीश मंदिर येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेऊन त्या परत घरी निघाल्या असता, मलवा यांच्या घरासमोर आल्या, तेव्हा हॉटेल ॲम्बेसिडरकडून समोरच्या दिशेने मोटारसायकलवर दोन अज्ञात चोरटे आले. पाठीमागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व चेन हिसकावून घेतली. वर्षा सोमानी यांना आपले दागिने हिसकावून नेल्याचे लक्षात आल्याने आरडाओरड केला. मात्र, चोरटे भरधाव वेगात कारंबा नाक्याच्या दिशेने पळून गेले. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास दुय्यम पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.
मंगळसूत्र सोडून पळ काढला
अन्य एका घटनेत विजापूर रोडवरील आदित्यनगरात सोमवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास सुशीला सर्वोत्तम रणशूर (वय ६५) या घरासमोर रांगोळी काढत होत्या. अज्ञात दोन चोरटे मोटारसायकलवरून आले. पाठीमागे बसलेल्या चोरट्याने सुशीला रणशूर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. या प्रकाराला त्यांनी प्रतिकार केला असता, तेव्हा चोरट्याच्या तोंडावरील मास्क खाली पडला. त्यामुळे चोरट्याने हिसकावून घेतलेले मंगळसूत्र तेथेच टाकून साथीदाराच्या मोटारसायकलवर पळून गेला. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास आमदार मुरकुटे करीत आहेत.