सीना नदीला महापूर; पुणे-सोलापूर एकेरी वाहतूक केली बंद, वाहनांच्या २० किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा
By आप्पासाहेब पाटील | Updated: September 24, 2025 15:49 IST2025-09-24T15:48:28+5:302025-09-24T15:49:23+5:30
पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक गाड्यांनी पर्यायी रस्त्यांने जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सीना नदीला महापूर; पुणे-सोलापूर एकेरी वाहतूक केली बंद, वाहनांच्या २० किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सीना नदीला महापूर आल्याने सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटी येथील पुलावरून पाणी वाहत आहे. या वाहत्या पाण्याचा प्रवाह पाहता जिल्हा प्रशासनाने बुधवारी सकाळपासून सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद केली आहे. दरम्यान, वाहनांची संख्या पाहता एकेरी वाहतूक ठप्प झाली असून सावळेश्वर टोलनाका ते बाळेपर्यंत म्हणजेच २० किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक गाड्यांनी पर्यायी रस्त्यांने जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रेल्वे गाड्यांही रद्द करण्यात आल्या आहेत. सीना, भोगावती नागझरी व भीमा नदीला पूर आला आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटी महामार्गावरील पूल पहिल्यांदाच पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने महसूल प्रशासनासह पोलीस यंत्रणा सकाळपासून लांबोटी पुलावर तळ ठोकूला आहे.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी पूरग्रस्त गावांचा दौरा करून लांबोटी येथे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे परिसराची पाहणी केली. सुरक्षिततेचा भाग म्हणून लांबोटी पुलावरची वाहतूक वळविण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनास सुचना दिल्या होत्या. त्यानुसार हा एकेरी मार्ग बंद करण्यात आला आहे. मागील आठवडाभरापासून सीना नदी पात्रात सीना कोळेगाव, खासपुरी व चांदणी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने सीना नदीला महापूर आला आहे.