सोलापुरातील दुकाने उद्यापासून सायंकाळी चारपर्यंतच सुरू राहणार, शनिवार व रविवारी पूर्ण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 18:24 IST2021-06-27T18:23:14+5:302021-06-27T18:24:58+5:30
मनपा आयुक्तांचे आदेश : सायंकाळी पाच वाजल्यानंतर शहरात संचारबंदी

सोलापुरातील दुकाने उद्यापासून सायंकाळी चारपर्यंतच सुरू राहणार, शनिवार व रविवारी पूर्ण बंद
सोलापूर - कोरोनाच्या नव्या विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्याचा उपाय म्हणून शहरात पुन्हा मिनी लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंतच खुली राहतील. मॉल व थिएटर पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले.
शहरातील हॉटेल, रेस्टाॅरंट पुन्हा एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सायंकाळी चारपर्यंत सुरू राहतील. चार ते रात्री ११ पर्यंत केवळ घरपोच सेवा देता येईल. सार्वजनिक मैदाने सकाळी ५ ते ९ या वेळेतच सुरू राहतील. मेळावे व इतर सामाजिक कार्यक्रम एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने आणि सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चारपर्यंतच करण्यात यावेत. विवाह सोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी असेल. अंत्यविधीसाठी २० जणांना परवानगी असेल. जीम, सलून, ब्युटी पार्लर, कृषी उपक्रम, मद्यविक्री, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते सायंकाळी चारपर्यंत सुरू राहतील. सायंकाळी पाचनंतर संचारबंदी असेल.