धक्कादायक; गरोदर नवविवाहित महिलेची आत्महत्या; कारण ऐकून बसेल धक्का...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 13:12 IST2020-09-04T13:10:29+5:302020-09-04T13:12:02+5:30
सोलापूर क्राईम बातमी

धक्कादायक; गरोदर नवविवाहित महिलेची आत्महत्या; कारण ऐकून बसेल धक्का...
करकंब : सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध करकंब पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्या रणजित गोड (वय १९, रा़ जळोली, ता़ पंढरपूर) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव असून बुधवारी हा प्रकार घडला़ याबाबत विद्याचे वडील औदुंबर मारुती बेडगे (रा. उपळाई (बु) यांनी करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ याप्रकरणी रणजित अंकुश गोड, अंकुश संतराम गोड, शांताबाई अंकुश गोड व विश्वजीत अंकुश गोड (सर्व रा़ जळोली, ता़ पंढरपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत म्हणून विद्या हिला नवरा, दीर, सासू, सासरा त्रास देत होते़ तसेच विद्या ही गरोदर असल्याने तिच्यावर औषधोपचार न केल्याने तिने या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले असे फिर्यादीत म्हटले आहे़ २ सप्टेंबर रोजी रात्री राहत्या घरात साडीच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली़ अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील करीत आहेत.
या प्रकरणात आरोपी रणजित अंकुश गोड व अंकुश संतराम गोड यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता सहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़