धक्कादायक; वटपोर्णिमेच्यादिवशीच महिलेनी केली विहिरीत उडी मारून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 14:46 IST2021-06-24T14:45:51+5:302021-06-24T14:46:00+5:30
माढा तालुक्यातील घटना

धक्कादायक; वटपोर्णिमेच्यादिवशीच महिलेनी केली विहिरीत उडी मारून आत्महत्या
कुर्डूवाडी : लऊळ (ता. माढा) येथील राहत्या घरातून कुर्डुवाडीला दवाखान्याच्या कामासाठी निघालेल्या महिलेने गावच्या शिवारातील सीना माढा उपसा सिंचन कॅनोलनजीक असणाऱ्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. रुक्मिणी नवनाथ देवकर (वय-४५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. नेमके वटपौर्णिमेच्याच दिवशी ही घटना घडल्यामुळे परिसरातील महिलावर्गातून हळहळ व्यक्त होत आहे.
आत्महत्या केलेल्या महिलेचे पतीला बुधवारी सायंकाळी अर्धांगवायुचा दुसरा झटका आल्याने कुर्डुवाडीतील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यामुळे मयत महिला गुरूवारी सकाळी ९ च्या दरम्यान घरातून दवाखान्यात जाते म्हणून मुलांना सांगून निघाली होती. दरम्यान रस्त्यातच तिने विहिरीच्या कठड्यावर चप्पल ठेऊन उडी मारून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळावर कुर्डुवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांनी धाव घेतली. सदर घटनेचा पंचनामा करुन महिलेला विहिरीतून बाहेर काढले व येथील शवविच्छेदनासाठी कुर्डुवाडी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. तिच्या पश्चात पती,दोन मुले असा परिवार आहे.