धक्कादायक; जन्मदात्या आईने दीड वर्षाच्या बाळास विहिरीत टाकून जीवे ठार मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 15:56 IST2020-10-11T15:56:05+5:302020-10-11T15:56:50+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

धक्कादायक; जन्मदात्या आईने दीड वर्षाच्या बाळास विहिरीत टाकून जीवे ठार मारले
करमाळा : स्वत:च्या जन्म दिलेल्या १६ महिने वयाच्या मुलास जन्मदात्या आईने विहिरीत टाकून दिल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आईस अटक केली आहे. हा प्रकार ९ ऑक्टोबरला दुपारी ४ च्या सुमारास घडला .
याप्रकरणी दत्ता सुभाष कडू, (रा. पोथरे ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, मी करमाळा येथे दीपक सोळंकी यांच्याकडे दुकानात कामाला असून आज नेहमीप्रमाणे कामाला आलो होतो. दुपारी माझी पत्नी घर सोडून मांगी रस्त्याने जात असल्याचे माझ्या मित्राकडून मला कळाले. त्यामुळे मी तिला शोधण्यासाठी गेलो. तिला मांगी रस्त्यावर शोधले व घराकडे घेऊन येत असताना मुलगा कोठे आहे हे विचारले असता तिने त्याला विहिरीत टाकले असे सांगितले. विहिरीकडे गेल्यानंतर मुलगा विहिरीच्या पाण्यावरती मृतस्थितीत आढळून आला.
याप्रकरणी पोलिसांनी रुपाली दत्ता कडू (वय २३) या मुलाच्या आई विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे हे करत आहेत.