शिवसेना आक्रमक; पंढरपुरात कंगनाच्या प्रतिकात्मक पोस्टरला मारले जोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 15:40 IST2020-09-05T15:40:12+5:302020-09-05T15:40:23+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

शिवसेना आक्रमक; पंढरपुरात कंगनाच्या प्रतिकात्मक पोस्टरला मारले जोडे
सोलापूर : महाराष्ट्र आणि मुंबई पोलीसांची बदनामी करणारी वक्तव्य केलेल्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या पोस्टरला जोडे मारून पंढरपुरातील शिवसैनिकांनी आज रोष प्रकट केला, तिच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देऊन प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारले.
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात येवून पोटभरल्यानंतर महाराष्ट्राचीच बदनामी करणारी प्रवृत्ती इथे खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देण्यात आला़ हे आंदोलन जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुखा शैला गोडसे, शहरप्रमुख रविंद्र मुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले़ यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना विरुद्ध कंगना; वाद पेटला
कंगना राणौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर वाद पेटला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असं सरनाईक म्हणाले.