शरद पवार म्हणाले; सन्मानाने आघाडी न झाल्यास सोलापूर महापालिका स्वबळावर लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 14:53 IST2021-10-08T14:53:45+5:302021-10-08T14:53:51+5:30
शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन; कोठेंनी फोडली काँग्रेस

शरद पवार म्हणाले; सन्मानाने आघाडी न झाल्यास सोलापूर महापालिका स्वबळावर लढा
सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकीत भाजप वगळून सर्व पक्षांची एकजूट झाली पाहिजे. पण ही एकजूट करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे अन्यथा स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार राहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सोलापुरात केले.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. पवार म्हणाले, महापालिका चुकीच्या लोकांच्या हातात गेली. त्याचा विपरीत परिणाम शहरावर झालेला दिसतो. हे चित्र बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडीवर असले पाहिजे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत सकाळी माझी बैठक झाली . या बैठकीत भाजप वगळून इतर सर्व पक्षांची एकजूट करता आली तर करा असे मी सांगितले. पण ही एकजूट सन्मानाने झाली पाहिजे. महापालिका निवडणुकीत अनुभवी लोकांसोबतच तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या, असे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्यात काँग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्यासह इतर नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.