सोलापूर : सोलापूरमधील काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे आज (१६ सप्टेंबर) सकाळी नऊ वाजता निधन झाले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 85 वर्षांच्या होत्या.
माजी आमदार निर्मला ठोकळ या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांचे पार्थिव बारा वाजता मुरारजी पेठ तोरणा बंगला येथे आणण्यात येणार असून, सायंकाळी पाच वाजता पुणे रोडवरील बाळे स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलं, सुना, नातवंड असा परिवार आहे.
निर्मला ठोकळ या दोन वेळा आमदार राहिलेल्या आहेत. सुरुवातीला त्या नगरसेविका होत्या. त्यानंतर 1972 ते 76 या काळात त्या जुन्या शहर दक्षिणमधून काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेवर निवडून गेल्या. पुढे त्यांचे भाऊजी ॲड बाबासाहेब भोसले हे 1982 मध्ये मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्या राज्यपाल कोट्यातून आमदार म्हणून विधान परिषदेवर गेल्या होत्या.
त्यानंतर निर्मला ठोकळ यांनी सोलापूर शहराच्या राजकारणात आपला कायम सहभाग नोंदवला. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्थाही आहेत.