मार्डी आरोग्य केंद्रातील फुटकी टाकी पाहून सीईओ दचकले अन् म्हणाले काय ही अवस्था...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 18:03 IST2022-01-14T18:03:15+5:302022-01-14T18:03:22+5:30
काय ही अवस्था? : नागरिकांचे आरोग्य कसे सुधारणार

मार्डी आरोग्य केंद्रातील फुटकी टाकी पाहून सीईओ दचकले अन् म्हणाले काय ही अवस्था...
मार्डी : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी आरोग्य केंद्रातील फुटकी टाकी पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी दचकले. आरोग्य केंद्राची ही अवस्था असेल, तर नागरिकांचे आरोग्य कसे सुधारणार, असा सवाल केल्यावर आरोग्य अधिकारी निरुत्तर झाले.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेच्या तयारीबाबपत सीईओ स्वामी यांनी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता अचानकपणे उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शेगर, बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित पाटील उपस्थित होते. सीईओ स्वामी यांनी आरोग्य केंद्राच्या परिसराची पाहणी केली. आरोग्य केंद्रातील पाण्याची टाकी फुटलेल्या अवस्थेत आहे, तशी जागेवर उभी होती. परिसरात झाडेझुडपे वाढलेली पाहून सीईओ स्वामी म्हणाले, हे आरोग्य केंद्र आहे. अशी अवस्था असेल तर नागरिकांचे आरोग्य काय चांगले राहणार, असा सवाल वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर मंगेडकर यांना केला. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी परिसरात सुधारणा करण्यात येईल, असे उत्तर दिले. यावेळी औषधनिर्माण अधिकारी केकडे, आरोग्य सहायक अडसूळ, शिंदे उपस्थित होते.
सरपंच अविनाश मार्तंडे यांनी सीईओ स्वामी यांचे स्वागत केले. याप्रसंगी उपसरपंच काशीनाथ कदम, प्रल्हाद काशीद उपस्थित होते. आरोग्य केंद्र परिसरात सुधारणा केल्या जातील, असे आश्वासन सरपंच मार्तंडे यांनी यावेळी दिले.