सोलापूर जिल्हा परिषदेवर संजय शिंदे यांची पकड घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 05:44 PM2018-03-29T17:44:54+5:302018-03-29T17:44:54+5:30

विश्लेषण - अर्थसंकल्पीय सभेत दिसले राजकीय रंग, वर्षानंतरही मोहिते-पाटील एकाकी !

Sanjay Shinde's grip on Solapur Zilla Parishad | सोलापूर जिल्हा परिषदेवर संजय शिंदे यांची पकड घट्ट

सोलापूर जिल्हा परिषदेवर संजय शिंदे यांची पकड घट्ट

Next
ठळक मुद्देमागील पंचवार्षिकमध्ये सुरेश हसापुरे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा ताबाजिल्हा परिषदेच्या कारभाराचा गाडा संजय शिंदे यांनी पूर्णपणे ताब्यात घेतला

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या राजकारणावर, प्रशासनावरही संजय शिंदे यांची पकड घट्ट झाल्याचे आणि एक वर्षानंतरही मोहिते-पाटील गट एकटा पडल्याचे मंगळवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत दिसून आले.

जिल्हा परिषदेची मंगळवारी झालेली अर्थसंकल्पीय सभा नावीन्यपूर्ण योजनांबरोबरच राजकीय कारणांनी चर्चेत राहिली. जिल्हा परिषदेच्या सेस फंडाचे प्रत्येक तालुक्यातील समान वाटप व्हायला हवे, अशी मागणी मोहिते-पाटील गट करीत आहे. उमेश पाटील यांनी तर या प्रश्नावरून संजय शिंदे यांची कोंडी करू, असा इशारा दिला होता. काल सभेत मोहिते-पाटील गटाचे सदस्य त्रिभुवन धार्इंजे यांनी सेस फंडाच्या असमान वाटपाचा मुद्दा उपस्थित केला.

 यासाठी त्यांनी व्यवस्थित आकडेवारीही सादर केली. हा विषय उपस्थित होणार असल्याची जाणीव शिंदे यांना होती. त्यामुळे तेही मागील काही वर्षातील सेस फंडाच्या तालुकानिहाय वाटपाची आकडेवारी घेऊन बसले होते. धार्इंजे यांना प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी प्रत्येक तालुक्याला अनुशेष लावेन, असे सांगतानाच राजकारण केले तर याद राखा, असा इशाराही दिला.

धार्इंजे एकटे पडले. त्यांना बळीराम साठे यांनी सावरून घेण्याचा प्रयत्न केला. मोहिते-पाटलांचे स्नेही वसंतराव देशमुख यांनी शिंदे यांना सबुरीचा सल्ला दिला. या विषयावर सभागृहाचे मत जाणून ज्यांना अडचण आहे त्यांनी हात वर करा, असे शिंदे यांनी सांगितल्यानंतर एकानेही हात वर केले नाहीत. यावरून एक वर्षानंतर आपल्याला सभागृहाचा भरभक्कम पाठिंबा असल्याचे संजय शिंदे यांनी दाखवून दिले. जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेळ नाही. परंतु, मोहिते-पाटील गटाला वगळून ऐनवेळी सर्व जण एकत्र येतील, अशी स्थिती कायम असल्याचे संकेत झेडपीच्या सर्वसाधारण सभेने दिले आहेत. 

मामा ठरवतील तीच रणनीती !
 - जिल्हा परिषदेच्या कारभाराचा गाडा संजय शिंदे यांनी पूर्णपणे ताब्यात घेतला आहे. कोणाला किती निधी द्यायचा इथपासून सर्वसाधारण सभेची रणनीती काय असेल हे तेच ठरवित आहेत. राष्ट्रवादीकडे आणि विशेषत: मोहिते-पाटील गटाकडे पाहायचे झाले तर राजकीय परिस्थितीचा अंदाज असल्याने विरोधी पक्षनेते बळीराम साठे नेमक्या मुद्यांवरच बोलणे पसंत करीत आहेत.  त्रिभुवन धार्इंजे, शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांची ही पहिलीच टर्म असल्याने ते जमेल त्या पद्धतीने किल्ला लढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

पाटलांना दमवले, इतरांचे काय...
- मागील पंचवार्षिकमध्ये सुरेश हसापुरे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा ताबा घेतला होता. यावेळी उमेश पाटील वेगळ्या प्रकारे तसा प्रयत्न करीत आहेत. परंतु, काल झालेल्या सभेत संजय शिंदे यांनी उमेश पाटील यांना अक्षरश: दमविले. समाजकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे यांच्या संदर्भातील विषय असो वा विषय शिक्षकांच्या पदावनतीचा मुद्दा असो यातील एकही विषय तडीस जाऊ दिला नाही. पक्षनेते आनंद तानवडे यांनीही आता बोलण्याची चौकट आखून घेतली आहे. इतर बोलके सदस्यही आता परिस्थिती ओळखून गप्प राहणे पसंत करीत आहेत. 
 

Web Title: Sanjay Shinde's grip on Solapur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.