'पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन हजार कोटी मंजूर; दिवाळीपूर्वी मदत जमा होणार थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर'; मुख्यमंत्र्यांची माहिती
By आप्पासाहेब पाटील | Updated: September 24, 2025 15:36 IST2025-09-24T15:35:42+5:302025-09-24T15:36:09+5:30
Solapur Flood News: शासन टंचाई कळत ज्या निकषाप्रमाणे मदत करते त्याप्रमाणेच अती पावसात, ओल्या दुष्काळात ही मदत केली जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना बोलताना सांगितले.

'पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन हजार कोटी मंजूर; दिवाळीपूर्वी मदत जमा होणार थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर'; मुख्यमंत्र्यांची माहिती
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांंच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येईल. पूरग्रस्तांना आवश्यक मदत देण्यासाठी शासन हात आखडता घेणार नाही. शासन टंचाई कळत ज्या निकषाप्रमाणे मदत करते त्याप्रमाणेच अती पावसात, ओल्या दुष्काळात ही मदत केली जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली, त्यांनी दोन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजीत मोहिते पाटील, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील निमगाव येथे नुकसानीची पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. या संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना आवश्यक मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दारफळ गावात पुरामुळे मोठे नुकसान झाले असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीने पात्र बदलले आणि गावाचा मोठा भाग पाण्यात गेला, तसेच लोकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे घरांचे, अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. शेती, जनावरांचे नुकसान झाले आहे. शासन शेती, घरादारांकरिता, अन्नधान्य आदींसाठी मदत करणार असून रस्ते, शाळा, शेतरस्ते, वीजव्यवस्था आदी सुविधांसाठीही आवश्यक ती सर्व मदत करणार आहे. व्यावसायिकांनाही नुकसानीसाठी स्वतंत्र मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.