केके एक्सप्रेसच्या धडकेत ड्युटीवरील आरपीएफ जवानाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 14:50 IST2025-03-01T14:50:18+5:302025-03-01T14:50:34+5:30
श्रीकांत वाघमारे असे मृत्यू झालेल्या आरपीएफ जवानाचे नाव आहे.

केके एक्सप्रेसच्या धडकेत ड्युटीवरील आरपीएफ जवानाचा मृत्यू
कुर्डूवाडी - पुणे-लोहमार्ग हद्दीतील जिंती रोड रेल्वे स्टेशन (ता. करमाळा) येथे पेट्रोलिंग करताना रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी नवी दिल्ली-बंगळुरू या केके एक्स्प्रेसने जोरदार धडक दिल्याने पेट्रोलिंग करणाऱ्या आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
श्रीकांत वाघमारे (वय ४२,रा.कुर्डूवाडी) असे मृत्यू झालेल्या आरपीएफ जवानाचे नाव आहे. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफ जवान श्रीकांत वाघमारे हे नुकतेच लातूर येथून भिगवण रेल्वे स्टेशन येथे बदली होऊन आले आहेत, ते शुक्रवारी जिंती रोड रेल्वे स्टेशन येथे पेट्रोलिंगसाठी कार्यरत होते, पण रात्री ९ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास केके एक्स्प्रेस येताना गाडीचा आवाज न आल्याने या गाडीची वाघमारे यांना जोराची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. श्रीकांत वाघमारे हे मूळचे कुर्डूवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.या बाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.