Response to ‘martyrdom’; In five days, five and a half thousand Solapurkars reached Pune | ‘हुतात्मा’ ला प्रतिसाद; पाच दिवसांत साडेपाच हजार सोलापूरकरांनी गाठले पुणे

‘हुतात्मा’ ला प्रतिसाद; पाच दिवसांत साडेपाच हजार सोलापूरकरांनी गाठले पुणे

ठळक मुद्देहुतात्मा एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून कुर्डूवाडी, दौंडमधून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली कोरोनाकाळात रेल्वे मंत्रालयाने बंद केलेल्या ज्येष्ठ, दिव्यांग, पासधारक, पत्रकारांना देण्यात येणाऱ्या सवलती बंदएक्स्प्रेस सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी ७५२ प्रवाशांनी सोलापूरहून पुणे गाठले, त्यातून रेल्वेला १ लाख ९१४ रुपयांचे उत्पन्न मिळाले

सोलापूर : कोरोनाकाळात बंद करण्यात आलेली हुतात्मा एक्स्प्रेस दहा ते अकरा महिन्यांनंतर सुरू झाली. पहिल्या दिवसापासून हुतात्माला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान, मागील पाच दिवसांत सुमारे साडेपाच हजार प्रवाशांनी हुतात्मा एक्स्प्रेसमधून पुणे गाठले आहे. दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे सोलापूर ते पुण्याचा प्रवास फक्त चार तासांचा झाला आहे. त्यामुळे प्रवासी एसटी बसपेक्षा रेल्वेला अधिक प्राधान्य देत असल्याचे सांगण्यात आले.

कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेने प्रवासी सेवा बंद केल्या होत्या. अनलॉककाळात शासनाने व केंद्राने दिलेले नियम, अटी पाळून प्रवासी रेल्वे सुरू केल्या. मात्र, सुरू करण्यात आलेल्या गाड्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले. सोलापूरकरांसाठी महत्त्वाची असलेली हुतात्मा एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वे संघटना व लोकप्रतिनिधींनी केली होती, त्याचा विचार करून व प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हुतात्मा सुरू करण्याबाबतचा अहवाल सोलापूर विभागाने पाठविला होता, त्यास अनुसरून रेल्वे मंत्रालयाने हुतात्मा एक्स्प्रेस विशेष एक्स्प्रेस नावाने सुरू केली. याला सध्या तरी ५० ते ६० टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.

दुसऱ्या आठवड्यात प्रवाशांची संख्या वाढली...

एक्स्प्रेस सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी ७५२ प्रवाशांनी सोलापूरहून पुणे गाठले, त्यातून रेल्वेला १ लाख ९१४ रुपयांचे उत्पन्न मिळाले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ६६५ प्रवाशांनी पुणे गाठले त्यातून रेल्वेला ८७ हजार ९२० रुपयांचे उत्पन्न मिळाले. दरम्यान, ३ मार्च रोजी ८०६, ४ मार्च रोजी ७१३, ५ मार्च रोजी ९८६, ८ मार्च रोजी १२६६ प्रवाशांनी पुणे गाठले.

ज्येष्ठ, दिव्यांग, पासधारकांच्या सवलती सुरू करा...

कोरोनाकाळात रेल्वे मंत्रालयाने बंद केलेल्या ज्येष्ठ, दिव्यांग, पासधारक, पत्रकारांना देण्यात येणाऱ्या सवलती बंद केल्या होत्या, आता सर्वकाही सुरळीत सुरू असून प्रवासी गाड्याही रुळावर आल्या आहेत. त्यामुळे ज्या सवलती बंद केल्या होत्या, त्या त्वरित सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव व राजेंद्र कांबळे यांनी केली आहे.

कुर्डूवाडी, दौंडमधून प्रवासी घटले...

हुतात्मा एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून कुर्डूवाडी, दौंडमधून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागील पाच दिवसांत बोटावर मोजण्याइतक्या प्रवाशांनी या गाडीतून प्रवास केला आहे. याशिवाय पुण्यातून सोलापूरला येणाऱ्याही प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. या गाडीचा लाभ नोकरदार, विद्यार्थी, खासगी कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना होत आहे.

हुतात्मा एक्स्प्रेसला सध्या प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यास आणखी प्रवासी वाढतील. रेल्वेच्या प्रवासी गाड्या आता हळूहळू रुळावर येत आहेत. इंद्रायणी एक्स्प्रेस चालू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर मंडल

Web Title: Response to ‘martyrdom’; In five days, five and a half thousand Solapurkars reached Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.