नव्या वैद्यकीय कायद्यातील बदलांना विरोध करीत सोलापूरातील २ हजार डॉक्टर संपावर, अत्यावश्यक सेवेवर परिणाम नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 12:46 IST2018-01-02T12:44:39+5:302018-01-02T12:46:10+5:30
केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलातील जाचक बदलांच्या निषेधार्थ देशभरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी सकाळी सहा ते सायंकाळी सहा असा बारा तासांचा बंद पाळला आहे़

नव्या वैद्यकीय कायद्यातील बदलांना विरोध करीत सोलापूरातील २ हजार डॉक्टर संपावर, अत्यावश्यक सेवेवर परिणाम नाही !
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २ : केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलातील जाचक बदलांच्या निषेधार्थ देशभरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी सकाळी सहा ते सायंकाळी सहा असा बारा तासांचा बंद पाळला आहे़ या संपात सोलापूरातील २ हजार डॉक्टरांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले़ मात्र अत्यावश्यक रुग्णसेवा सुरु असल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी रूग्णांना होत नसल्याचेही दिसत आहे़
केंद्र सरकारच्या वतीने नॅशनल मेडिकल कमिशन बिलांतर्गत मोठे फेरबदल केले जाणार आहेत़ त्यात डॉक्टरांचे प्रतिनिधी घटवण्यात येणार असून, शासन नियुक्त प्रतिनिधी वाढवण्यात येणार आहेत़ त्यामुळे सरकारच्या चुकीचे धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे़ वैैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देतानाही चुकीची धोरणे राबविली जाण्याची शक्यता आहे़ त्यासोबतच नीटसारख्या सामाईक परीक्षातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे़ याचा त्रास वैद्यकीय व्यावसायिकांसह विद्यार्थ्यांना होणार आहे़ केंद्राचे हे नवे विधेयक २ जानेवारी रोजी संसदेत मांडले जाणार आहे़ या लोकशाही विरोधी विधेयकाला विरोध करण्यासाठी आयएमएने हा एक दिवसाचा बंद पुकारला आहे़ यादरम्यान निवेदन देऊन आंदोलन केले जाणार आहे़ आंदोलनादरम्यान बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार आहे़ शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत़ अत्यावश्यक शस्त्रक्रिया मात्र केल्या जातील अशी माहिती आयएमएच्या शाखेने दिली़
------------------
दोन हजार डॉक्टरांचा सहभाग...
- सोलापूर शहरातील ७५० डॉक्टर आयएमएचे सदस्य आहेत़ ग्रामीण भागातील अकलूज, बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, कुर्डूवाडी येथील बहुतांश रुग्णालये बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवून तेथील डॉक्टर संपात सहभागी होत आहेत़ जवळपास दोन हजार डॉक्टरांचा यात समावेश असणार आहे़
--------------
लोकसभेत सादर झालेले बिल रुग्ण वैैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आणि डॉक्टरांनाही नुकसानीचे आहे़ त्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत १२ तास बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार आहे़ आंतररुग्ण आणि तातडीची सेवा सुरुच राहणार आहे़
- डॉ़ ज्योती चिडगुपकर
चेअरमन, आयएमए सोलापूर