नातवाला पाहून निघालेल्या आजीचे मंगळसूत्र पळवले; गर्दीचा फायदा घेणाऱ्या दोघीजण ताब्यात, पंढरपुरातील घटना
By काशिनाथ वाघमारे | Updated: November 24, 2023 19:37 IST2023-11-24T19:37:08+5:302023-11-24T19:37:24+5:30
जन्मलेल्या नातवाला पाहून गावाकडे निघालेली आजी एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले.

नातवाला पाहून निघालेल्या आजीचे मंगळसूत्र पळवले; गर्दीचा फायदा घेणाऱ्या दोघीजण ताब्यात, पंढरपुरातील घटना
सोलापूर : जन्मलेल्या नातवाला पाहून गावाकडे निघालेली आजी एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. त्या महिलेने साध्या वेशातील पोलिसांशी संपर्क साधताच पथकाने दोन संशयीत महिलांना ताब्यात घेऊन झडती घेतली असतान लांबवलेले ७६ हजारांचे मंगळसूत्र काढून दिले.पोलीस सूत्राकडील माहीतीनुसार, दीपाली दिलीप चव्हाण (वय ५२, रा. धानोरी, पुणे) यांची सून काही दिवसांपूर्वी प्रसूती झाली. नातवास पाहण्यासाठी पती व दोन मुलासह त्या चिकमुहुद (ता. सांगोला) येथे आल्या होत्या.
नातवाला पाहून झाल्यानंतर पुन्हा त्या एसटी बसने चिकमहूद येथून निघाल्या. ऑनलाईन टिकीट बुकींग केल्याने त्या पंढरपूरला आल्या. दुपारी दोनच्या सुमारास नवीन बसस्थानकातील फलाट क्र १५ समोरील एसटीबसमध्ये चढत होत्या. गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र पाठीमागून कोणीतरी ओढल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी गळ्याला हात लावून पाहीले त्यावेळी मंगळसूत्र नव्हते. त्यांनी लगेच पाठीमागे वळून पाहीले. त्यावेळी त्यांच्यामागे दोन महिला उभ्या होत्या. त्याचवेळी साध्या वेशात असलेल्या पोलीस हवालदार बिपीनचंद्र ढेरे, सचिन हेंबाडे, पोलीस नाईक राकेश लोहार, सुनील बनसोडे, शरद कदम यांच्या पथकाने दीपाली चव्हाण व त्या दोन महिलांना एसटी बाहेर काढले.
भांबरी (लातूर) आणि मानखुर्द (मुंबई) येथील या दोन महिला असून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यांची झडती घेतली असता एकीने चोरीस गेलेले ११ ग्रॅम ७२० मिली वजनाचे ७६ हजारांचे मंगळसूत्र काढून दिले. या दोघींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.