पावसामुळे विजेचा प्रवाह लोखंडी डब्यात उतरला; अचानक हात लावताच खाली कोसळून जीव गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 15:48 IST2021-07-25T15:48:43+5:302021-07-25T15:48:50+5:30
नन्हेगावातील घटना - महावितरणकडून मदत मिळण्याची मागणी

पावसामुळे विजेचा प्रवाह लोखंडी डब्यात उतरला; अचानक हात लावताच खाली कोसळून जीव गेला
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील नन्हेगांव येथील संतोष काशीनाथ मुलगे (वय ३५) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजता घडली.
संतोष हे आपल्या शेतातील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले होते. पावसामुळे विद्युत मोटार चालू-बंद करण्याच्या लोखंडी डब्यात विजेचा प्रवाह उतरला होता. त्यांनी लोखंडी डब्याला हात लावताच विजेचा धक्का लागून ते खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे.
मागील काही दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे अनेक भागांतील घरांसोबत शेतीपिकांचे नुकसान झाले. पावसाळ्यात विजेची उपकरणे हाताळताना योग्य काळजी घेण्याचे आवाहन महावितरणकडून काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. मात्र शेतकरी वर्गांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.