सोलापूर- धाराशिव रेल्वे मार्गाकडे पंतप्रधानांचे लक्ष : रावसाहेब दानवे
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 27, 2023 20:01 IST2023-02-27T20:00:40+5:302023-02-27T20:01:04+5:30
सोलापूर- धाराशिव रेल्वे मार्ग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातील प्रकल्प आहे. या प्रकल्पाकडे त्यांचे लक्ष असून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

सोलापूर- धाराशिव रेल्वे मार्गाकडे पंतप्रधानांचे लक्ष : रावसाहेब दानवे
सोलापूर - सोलापूर- धाराशिव रेल्वे मार्ग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातील प्रकल्प आहे. या प्रकल्पाकडे त्यांचे लक्ष असून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने सुरू असून लवकरच रेल्वे अधिकाऱ्यांची सोलापुरात किंवा तुळजापुरात बैठक बोलवू. त्यासोबत सोलापूर- मुंबई वंदे भारतच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना आल्या आहेत. त्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
मंत्री रावसाहेब दानवे हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा सोलापूरला वंदे भारत मिळाली. त्यासोबत शिर्डीलाही मिळाली. त्यामुळे याचा फायदा सोलापूरसह महाराष्ट्रातील नागरिकांना होत आहे. वेळेचा फरक मी समजू शकतो. सध्या ट्रॅफिकची अडचण आहे. ट्रॅफिकचा प्रश्न सुटला की वंदे भारत सोलापूरकरांच्या सोयीनुसार सोडू. त्याबाबत अधिकाऱ्यांची बैठक बोलावणार आहे. मुंबईतून दुपारी सव्वा चार ऐवजी सायंकाळी सोडता येईल का, याबाबत चर्चा करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.