सोलापुरात सार्वजनिक मंडळांकडून वीजचोरी; ४२२ पैकी १८ मंडळांनीच घेतली अधिकृत वीजजोडणी
By Appasaheb.patil | Updated: October 4, 2022 16:46 IST2022-10-04T16:46:05+5:302022-10-04T16:46:11+5:30
आप्पासाहेब पाटील सोलापूर : सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन केले होते. ...

सोलापुरात सार्वजनिक मंडळांकडून वीजचोरी; ४२२ पैकी १८ मंडळांनीच घेतली अधिकृत वीजजोडणी
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन केले होते. मात्र, सोलापूर शहरात ४२२ सार्वजनिक मंडळे असताना फक्त १८ मंडळांनीच वीज जोडणी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धार्मिक भावनेचा विषय असल्याने महावितरणकडूनही वीजचोरांवर कारवाईसाठी दोन पावले मागे घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितले.
----------
अपघात टाळण्यासाठी उपाययोजना
सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन केले असतानाही मंडळांनी रितसर वीज जोडणी घेतली नाही. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटींमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना केल्याचे मात्र निर्दशनास येत आहे.
----------
घरगुती ग्राहकांप्रमाणेच होते मंडळांना वीजदर
महावितरणकडून नवरात्र उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या १०० युनिटसाठी केवळ ४ रुपये ७१ पैसे प्रति युनिट, १०१ ते ३०० युनिटसाठी ८ रुपये ६९ पैसे प्रति युनिट, ३०१ ते ५०० प्रती युनिट वीज वापरासाठी ११ रुपये ७२ पैसे प्रति युनिट आणि ५०० युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी १३ रुपये २१ पैसे दराने वीजपुरवठा देण्यात येणार होता.
----------
कारवाई होणार का ?
सोलापूर शहरात ४०० हून अधिक सार्वजनिक मंडळे आहेत. त्यापैकी फक्त १८ मंडळांनी रितसर वीजजोडणी घेतली. मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाईचे संकेत महावितरणने दिले होते. मात्र, एकाही मंडळावर महावितरणकडून कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगितले.
------------
आकडे टाकून घेतली वीज
सोलापूर शहरातील बहुतांश मंडळांनी तारेवर आकडे टाकून वीज घेतली आहे. शिवाय अन्य काही मंडळांनी मंडपाच्या शेजारी असलेल्या घरातून वीज घेतली आहे. दरम्यान, अनेक देवींच्या मंदिरात वीजजोडणी आहे, त्याही मंदिरातून अनेकांनी वीज घेतल्याचे सांगण्यात आले.