Positive self-talk is important ...! | सकारात्मक स्वसंवाद महत्त्वाचा...!
सकारात्मक स्वसंवाद महत्त्वाचा...!

लोक  आपल्याविषयी काय बोलतात, यापेक्षा आपण स्वत:विषयी काय बोलतो हे जास्त महत्त्वाचे ठरते. आपली स्वत:ची प्रतिमा आपल्या मनात कशी आहे, ती सकारात्मक आहे का नकारात्मक, यावरून आपले व्यक्तिमत्त्व बनत असते. यावरूनच आपली आयुष्याची वाटचाल सुलभ किंवा कठीण होते. ‘माझे नशीबच खोटे आहे’, ‘मी दिसायला कुरूप आहे’, ‘मला सतत अपयशच येते’, ‘माझी परिस्थिती वाईट आहे’,‘हे जग चांगले नाही’, ‘माझ्या हातून काहीही होणार नाही’, या आणि यासारखे इतर नकारात्मक संवाद आपण स्वत:शी करत असूत, तर आयुष्यात चांगले काही घडण्याची आपण अपेक्षाच कशी ठेवू शकतो?. आपली सर्व शक्ती आपण नकारात्मक विचारात, संवादात खर्च करत असूत तर आपल्या हातून नवनिर्मिती होणार कशी? आपण आपली प्रगती कशी साधणार? शारीरिक व्यंगावर एखाद्या वेळेस मात करता येऊ शकेल, पण मनाच्या व्यंगाचे काय?. यावरून सकारात्मक स्वसंवादाचे महत्त्व अधोरेखित करणे गरजेचे आहे.

‘मी सर्व शक्तिमान अशा परमेश्वराची एक निर्मिती आहे, एक अंश आहे’ ‘मी कोणतेही काम माझ्यात असलेल्या अंगभूत शक्तीमुळे, आत्मसात केलेल्या ज्ञानाच्या बळावर पूर्ण करू शकतो’. ‘माझ्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही’. ‘मी कोणत्याही आलेल्या संकटावर मात करू शकतो’. ‘मी माझी सध्याची वाईट परिस्थिती बदलू शकत्तो’. ‘मी काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी माझ्यामधली ऊर्जा वापरेन’. ‘हे जग सुंदर आहे ते अजून सुंदर करण्याचा मी जाणीवपूर्वक प्रयत्न करेन’, ‘चांगलं दिसणं माझ्या हातात नाही, पण चांगलं बनणं माझ्या हातात आहे’, यासारखे सकारात्मक स्वसंवाद नक्कीच फायदेशीर ठरू शकतील. असे     संवाद जर आपण साधत नसूत                तर ते जाणीवपूर्वक साधणे गरजेचे आहे.

नकारात्मक स्वसंवाद साधणारी व्यक्ती हा इतरांशी देखील नकारात्मकच बोलत असतो. त्याचा स्वभाव सतत किरकिरा बनतो. नवीन कोणत्याही गोष्टीमध्ये त्याला रस नसतो. त्याच्यासाठी आयुष्य हे सुंदर नसून कंटाळवाणे बनते. त्याची प्रगती खुंटते. तो अपयशाच्या खोल दरीत ढकलला जातो. अशा व्यक्ती जर आपल्या आजूबाजूला असतील तर अशा व्यक्तीपासून दूर राहणे हे आपल्या हिताचे ठरते.
नकारात्मक स्वसंवाद हा नकारात्मक जीवनशैलीचा परिणाम असतो की, ज्यात खालील काही घटक समाविष्ट होतात. व्यसनाधीनता, वाईट संगत, आळशी वृत्ती, सतत कामाचा ताण, विस्कळीत कौटुंबिक नातेसंबंध. सकारात्मक स्वसंवाद साधायचा असेल तर सकारात्मक जीवनशैली देखील अंगीकारणे गरजेचे असते की, ज्यात खालील काही गोष्टी समाविष्ट होतात. नियमित व्यायाम, चांगली संगत, कामाचे योग्य नियोजन, सुदृढ नातेसंबंध, एखादा छंद.

या उलट सकारात्मक स्वसंवाद साधणारी व्यक्ती इतरांशी देखील सकारात्मकच बोलते. त्याच्या अंगात एक उत्साह असतो. काहीतरी नवीन करण्याची त्याच्यात ऊर्मी असते. आपल्यातील ऊर्जा तो इतरांना देखील देतो. तो इतरांना आपल्याकडे आकर्षित करतो. आपसूकच त्याचा प्रगतीचा वेग वाढतो. तो सगळ्यांना हवाहवासा वाटतो. अशा व्यक्तीशी जवळीक साधणे , मैत्री करणे हे आपल्या हिताचे ठरते.

आपल्या विचारांना सकारात्मकतेची धार लावण्याचे कसब आपल्या अंगी येणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टी घडण्यामागचा सकारात्मकच विचार पहिल्यांदा आपल्या मनात डोकायला पाहिजे. विचार बदलायला जरी बराच अवधी लागला तरी हळूहळू हे आपल्या अंगवळणी निश्चतच पडेल.

जगणं हे सुदर बनवायचं का कंटाळवाणं, हे सर्वस्वी आपल्या हातात आहे, आपल्या विचारात आहे. नकारात्मक विचाराकडून सकारात्मकतेकडे जाणे कधीही हिताचे ठरते. नकारात्मक स्वसंवाद जेव्हा आपण साधतो तेव्हा ही सृष्टी ‘तथास्तू म्हणते व सकारात्मक स्वसंवाद साधतानादेखील. परंतु पहिला तथास्तू आपल्यासाठी शाप बनतो तर दुसरा वरदान. असा शाप घ्यावयास कोणाला आवडेल, ‘नाही का ?
- महेश भा. रायखेलकर
(लेखक संगणक प्रशिक्षक आहेत.) 

Web Title: Positive self-talk is important ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.