दहा दिवसांनंतर सोलापुरातील हवा पूर्वपदावर; फटाक्यांचा धूर गायब, प्रदूषण झाले कमी
By शीतलकुमार कांबळे | Updated: November 24, 2023 18:11 IST2023-11-24T18:10:59+5:302023-11-24T18:11:18+5:30
देशभरातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फटाके फोडल्यामुळे हवेत धूर पसरला होता.

दहा दिवसांनंतर सोलापुरातील हवा पूर्वपदावर; फटाक्यांचा धूर गायब, प्रदूषण झाले कमी
सोलापूर : वातावरणात पडलेला गारवा, धुके त्यात दिवाळीच्या चार दिवसामध्ये फोडलेले फटाके यामुळे शहरातील हवा प्रदूषित झाली होती. दिवाळी झाल्याच्या १० दिवसानंतर शहरातील हवा पूर्वपदावर येत आहे. दूषित हवा स्वच्छ झाल्याचे दिसून आले.
देशभरातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फटाके फोडल्यामुळे हवेत धूर पसरला होता. सोलापूर शहरात देखील फटाके फोडण्यात आले. त्यात शहरात धुळीचे प्रमाण जास्त असते. फटाक्यांच्या धूरांमुळे प्रदूषणात भर पडली. त्यामुळे नेहमी शहराचा एक्यूआय (एयर क्वालिटी इंडेक्स) जो १०० च्या आसपास असतो, तो २०० च्या पुढे गेला होता. हवा प्रदूषित झाल्यामुळे श्वसन, ह्रदयसंबंधी आजार असणाऱ्या नागरिकांना त्रास झाला.
न्यायालयाने देशभरात फटाके फोडण्यासाठी वेळेचे निर्बंध लादले होते. मात्र दिवाळीच्या दोन तीन दिवसात प्रदूषणाचा मीटर २०० च्या पुढे गेला. दिवाळीच्या अतिशबाजीनंतर आणि हवेत जमलेल्या सूक्ष्म धुळीच्या कणातून, त्यात हवेतील दमटता, प्रदुषणकारी कारखाने, वाढणारी वाहतूक यामुळे प्रदूषण वाढले होते.
ज्ञानेश्वर नगर येथील प्रदूषण मापक यंत्रामध्ये शुक्रवारी दुपारी १२ वाजता एक्यूआय हा ९५ इतके नोंदले गेले. रत्नदीप सोसायटी येथील प्रदूषण मापक यंत्रात शुक्रवारी दुपारी १२ वाजता एक्यूआय़ हा ६४ इतका नोंदविला गेला.