शहाजीबापू पाटलांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात; एक ठार, एक जखमी
By Appasaheb.patil | Updated: February 9, 2023 17:28 IST2023-02-09T17:26:27+5:302023-02-09T17:28:17+5:30
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले.

शहाजीबापू पाटलांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात; एक ठार, एक जखमी
सोलापूर : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील सरकारी पोलिस गाडीचा आणि मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला व एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात नाझरे गावाजवळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गाड्यांचा ताफा नाझरे गावामधून सांगोल्याकडे जात असताना नाझरे गावच्या जिल्हा मार्गावरील अंतर्गत रोडवर आमदार शहाजी पाटील यांच्या ताफ्यामधील सरकारी पोलीस स्कार्पिओ गाडी क्रमांक M H 13 DM 1940 आणि मोटारसायकल क्रमांक MH 45 AG 6330 या दोन्ही गाड्यांचा समोरासमोर अपघात झाला.
या अपघातात मोटारसायकलस्वार अशोक नाना वाघमारे (वय 50, रा. माडगूळे. ता. आटपाडी, जि. सांगली) हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पाठीमागे बसलेले नाना अमूने हे (रा. एकतपुर, ता. सांगोला) गंभीर जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच महामार्गाच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले.