पंतप्रधान मोदी उद्या सोलापुरात
By Admin | Updated: August 15, 2014 00:35 IST2014-08-15T00:35:43+5:302014-08-15T00:35:43+5:30
राज्यपाल, मुख्यमंत्री अन् जपानचे राजदूतही येणार

पंतप्रधान मोदी उद्या सोलापुरात
सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, १६ आॅगस्ट रोजी दुपारी चार वाजता सोलापुरात येणार असून, त्यांच्या हस्ते सोलापूर-पुणे महामार्गाचे तसेच पॉवरग्रीडचे लोकार्पण करण्यात येणार आहे़ विशेष म्हणजे यावेळी जपानचे भारतातील राजदूत टेकशी यागी उपस्थित राहणार आहेत़ दीड तासाच्या दौऱ्यानंतर मोदी ५-३० वाजता परत रवाना होतील.
याचवेळी होम मैदानावर सोलापूर ते संगारेड्डी आणि सोलापूर ते येडशी या महामार्गाचा कोनशिला समारंभ आयोजित केला आहे़ पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यासह खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, खा़ शरद बनसोडे, खा़ रवींद्र गायकवाड यांच्यासह नेते उपस्थित राहणार आहेत़
सोलापूर ते पुणे या महामार्गाचे चौपदरीकरण आयएल अॅण्ड एफएस या कंपनीकडून करण्यात आले असून, याचा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे़ याचवेळी उर्वरित तिन्ही कार्यक्रम कळ दाबून होम मैदानावर होणार आहेत़ मोदींच्या दौऱ्यानिमित्त शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून, होम मैदानावर ये-जा करणे अवघड झाले आहे़ सुमारे एक लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करुन नियोजन केले जात आहे़ पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे शहरातील सर्व वातावरण बदलले आहे. विमानतळ ते होम मैदान हा मार्ग सुरक्षित करण्यात आला आहे़