या गावातील लोक स्मशानभूमीऐवजी ओढ्यात करतात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 13:23 IST2020-10-06T13:21:29+5:302020-10-06T13:23:35+5:30
लोकमत न्युज नेटवर्क

या गावातील लोक स्मशानभूमीऐवजी ओढ्यात करतात अंत्यसंस्कार
मोडनिंब : मोडनिंब येथील आदर्शनगर भागात स्मशानभूमी नसल्याने कोणाचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांना ओढ्यातच अंत्यसंस्कार करावे लागतात़ अंत्यसंस्कारानंतर पाऊस झाल्यास ओढ्याला पाणी आल्यास तिसºयाच्या सावडण्याच्या विधीसाठी राखही शिल्लक राहत नाही़ ती वाहून गेल्यास अडचण निर्माण होते़ त्यामुळे स्मशानभूमी तयार करून पत्राशेडची उभारणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
आदर्श नगर हे दोन हजार लोकसंख्येची वसाहत आहे; मात्र या ठिकाणी कोणाच्या घरी मयत झाल्यास त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी जागा नाही़ त्यामुळे नातेवाईकांना हायवेलगत असलेल्या गाव ओढ्यात अंत्यसंस्कार करावे लागतात़ त्या ठिकाणी ना वीज ना पाण्याची सोय़ रात्री एखादी व्यक्ती मयत झाल्यास गॅसबत्ती, टेंबा किंवा बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी करावा लागतो़ पावसाळ्यात तर ओढ्यात पाणी असल्याने काठावरच हा विधी उरकावा लागतो़ त्यामुळे आदर्श नगरमध्ये स्मशानभूमीची सोय करण्याची मागणी होत आहे.
आदर्श नगरमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने शासनाकडून मंजूर होऊन आलेला निधी दोनवेळा परत गेला आहे़ त्यामुळे स्मशानभूमीसाठी आता लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे़
- चांगदेव वरवडे,
ग्रामपंचायत सदस्य