भरधाव मोटारसायकल धडकेत पादचारी ठार; अपघातात दुचाकीस्वार जखमी
By काशिनाथ वाघमारे | Updated: March 29, 2024 22:22 IST2024-03-29T22:20:50+5:302024-03-29T22:22:02+5:30
पानगाव येथे अपघातात दुचाकीस्वार जखमी

भरधाव मोटारसायकल धडकेत पादचारी ठार; अपघातात दुचाकीस्वार जखमी
सोलापूर : भरधाव मोटारसायकलने पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील एकजण जखमी झाला, तर साथीदार तेथून गायब झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री ७:४५ सुमारास बार्शी-सोलापूर रस्त्यावर पानगाव येथे बीएसएनएल कार्यालयाच्या समोर घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैरागहून बार्शीकडे निघालेली मोटारसायकल (एम. एच. २५/ ए. क्यू. ८७४४) ने रस्त्याच्या कडेने निघालेले दशरथ शिवाजी बोधले (वय ४५) या पादचाऱ्यास जोरदार धडक दिली. या अपघातात दशरथ बोधले यांना तातडीने उपचारासाठी बार्शीला हलविण्यात आले. पण, उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, या अपघातात दुचाकीस्वारांपैकी प्रमोद लोखंडे (रा. हिंगणगांव, ता. परंडा) हा जखमी झाला. त्यालाही ग्रामस्थांनी उपचाराला बार्शी येथे पाठविले. मात्र, लोखंडे याचा साथीदार हा एवढ्या गर्दीतून गायब झाला. या अपघाताची बार्शी तालुका पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू होते.