शरद पवारांचे आशिर्वाद घेऊन दत्तात्रय सावंतांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 15:23 IST2020-11-12T15:17:50+5:302020-11-12T15:23:41+5:30
राष्ट्रवादीकडून होते इच्छूक : काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या

शरद पवारांचे आशिर्वाद घेऊन दत्तात्रय सावंतांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
सोलापूर : पुणे शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असलेले विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांनी गुरुवारी महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी सावंत यांनी बारामतीत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशिर्वाद घेतले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दत्तात्रय सावंत हे पुणे शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. यंदा त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर शिक्षक मतदारसंघ काँग्रेसकडे राहिला. काँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून कोल्हापूरच्या जयंत आसगांवकर यांना उमेदवारी दिली.
राष्ट्रवादीचे नेते आसगांवकर यांनाच मदत करतील असे सांगण्यात आले. यादरम्यान आमदार दत्तात्रय सावंत यांनी गुरुवारी सकाळी बारामती येथे जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यांचे आशिर्वाद घेऊनच उमेदवारी अर्ज दाखल करतोय, असे सावंत यांनी माध्यमांना सांगितले. यावेळी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळराम पाटील उपस्थित होते.