पोलिसांमधील जणू ‘पांडुरंग’ धावला; हरविलेला बालक माऊलीच्या कुशीत विसावला !
By Appasaheb.patil | Published: November 10, 2020 02:10 PM2020-11-10T14:10:33+5:302020-11-10T14:12:58+5:30
गर्दीने झाली होती ताटातूट : लेकराला पाहताच मातेचे दुखावलेले नेत्र सुखावले!
सुजल पाटील
सोलापूर : दिवाळीनिमित्त साहित्य, कपडे खरेदीच्या नादात मायमाऊलीपासून दीड-दोन वर्षीय मुलगा दुरावला. आईच दिसेनासे झाल्याने मुलगा रडतच एका दुकानासमोर उभा होता. मायलेकाची एकमेकांपासून ताटातूट झाली होती. एका युवकाने प्रेमाने जवळ घेत त्याला वाहतूक पोलीस पांडुरंग बिराजदार यांच्या स्वाधीन केले. पोलिसांमधील जणू या ‘पांडुरंग’नेच त्या मायमाऊलीचा शोध लावत त्या मुलाला तिच्याकडे सोपवले. आई सोना सागर धोत्रे आणि तिच्यापासून दूर गेलेला हर्षद यांची अखेर गळाभेटही झाली.
नवीपेठेतील हा प्रसंग. सायंकाळचे सात वाजलेले. दिवाळी खरेदीसाठी आईबरोबर आलेला मुलगा तिच्यापासून दुरावला. गर्दीत मुलाची वाट चुकली, आईची साथ सुटली अन् हातही सुटला. तेथे थांबलेल्या सुनील उमदे याने त्याला प्रेमाने जवळ घेत कहाणी ऐकून घेतली. सुनीलने त्याला वाहतूक पोलीस पांडुरंग बिराजदारकडे स्वाधीन केले. पांडुरंग यांनी अख्खी नवीपेठ पालथी घालूनही त्याची आई काही मिळत नव्हती. दरम्यान, पांडुरंग यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना कळवले. नेमक्या सदर बझार पोलीस ठाण्यात त्याची आई आली. तिने मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली. तितक्यात वाहतूक पोलीस बिराजदार हे त्या मुलास घेऊन तेथे दाखल झाले. समोर आपला मुलगा दिसताच त्या मायमाऊलीचे पाणावलेले नेत्र सुखावून गेले. दरम्यान, खरेदी करताना महिलांनी शक्यतो मुलांना आणू नयेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीत जाणे टाळावे. दिवाळीत होणाऱ्या गर्दीचा विचार करूनच नागरिकांनी बाहेर पडावे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
पांडुरंगांनी दुकानं पालथी घातली !
आईपासून ताटातूट झालेल्या या मुलाची भेट घडवून आणण्यासाठी वाहतूक पोलीस पांडुरंग यांनी नवीपेठेतील प्रत्येक दुकान पालथे घातले. कुठे याची माता सापडते का? हाच विचार मनी बाळगून पांडुरंगाची पावलं झेपावत होती. ‘इथं तुझी आहे का?’ अशी सतत विचारणा पांडुरंग यांनी त्या मुलाकडे करीत होता. काही दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेजही पांडुरंग बिराजदार तपासताना दिसत होते.
गर्दीत हरवलेल्या मुलाला सुनील उमदे या युवकाने माझ्या स्वाधीन केले. त्यानंतर मी व सुनीलने संपूर्ण बाजारपेठेत त्या मुलाच्या आईचा शोध घेतला. मात्र त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे मी संबंधित कंट्रोलला कळवून माहिती दिली. काही वेळातच पोलीस दाखल झाले अन् त्या मुलाची आईही दाखल झाली. मायलेकरांची भेट घडवून आणली यातच मला समाधान आहे.
-पांडुरंग बिराजदार, वाहतूक पोलीस
पंधरा ते वीस मिनिटांपासून एकाच ठिकाणी थांबलेल्या मुलाला पाहून मला संशय आला. तत्काळ मी त्या मुलाला घेऊन पारस इस्टेटसमोर थांबलेले पोलीस कर्मचारी यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी मातेचा शोध लावला. मायलेकराची भेट झाली. खूप आनंद वाटला.
-सुनील उमदे.