अत्याचाराच्या विरोधात सोलापूरात सर्वपक्षीय मुकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 14:42 IST2018-09-19T14:39:03+5:302018-09-19T14:42:56+5:30
अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरण : शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय

अत्याचाराच्या विरोधात सोलापूरात सर्वपक्षीय मुकमोर्चा
सोलापूर : अहमदनगर शहरातील तोफखाना परिसरात राहणाºया अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात सोलापूरात पद्मशाली समाजाच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मुकमोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कन्ना चौकमार्गे साखर पेठ, आजोबा गणपती, विजापूर वेस, मार्कडेय मंदीर, सिध्देश्वर प्रशालामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया नराधमास फाशीची शिक्षा व्हावी, आरोपीस मदत करणारे व दबाव टाकणारे यांनाही सहआरोपी करावे, सदर खटला दु्रतगती न्यायालयात चालवावा, सरकारी वकील उज्जवल निकम यांची नेमणुक करावी, पिडीत कुटुंबाला तातडीची २५ लाखांची मदत द्यावी, पिडीत मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा व भविष्यात तिला शासकीय नोकरीची लेखी हमी द्यावी, मुलीला सर्व प्रकारची उच्च दर्जाची वैद्यकीय मदत मिळावी, पिडीत मुलीच्या कुटुंबियास संरक्षण द्यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेल्या मुकमोर्चाचे रूपांतर सभेत झाले़ यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, सरचिटणीस सुरेश फलमारी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष पांडूरंग दिड्डी, सरचिटणीस दशरथ गोप, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र कमटम, सरचिटणीस महेश धारा, मुकमोर्चाचे निमंत्रक अशोक इंदापुरे, माजी आमदार नरसय्या आडम, महापौर शोभा बनशेट्टी, भाजपाच्या वृषाली चालुक्य, काँग्रेसचे प्रकाश वाले, बसपाचे आनंद चंदनशिवे, मराठा समाजाचे माऊली पवार, राष्ट्रवादीचे भारत जाधव, संतोष पवार, नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर, नागेश वल्याळ, फिरदोस पटेल, देवेंद्र कोठे आदी सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते़