महामारीला एक वर्ष; वर्षभरात कोरोनानं सोलापूरकरांचं जगणंच बदलून टाकलं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 01:05 PM2021-04-12T13:05:28+5:302021-04-12T13:05:33+5:30

थांबलेला व्यापार अन्‌ बुडालेल्या रोजगाराने वर्ष स्मरणात

One year to the epidemic; Throughout the year, Corona changed the lives of Solapurkars! | महामारीला एक वर्ष; वर्षभरात कोरोनानं सोलापूरकरांचं जगणंच बदलून टाकलं !

महामारीला एक वर्ष; वर्षभरात कोरोनानं सोलापूरकरांचं जगणंच बदलून टाकलं !

Next

राजकुमार सारोळे

सोलापूर : १२ एप्रिल २०२०... हा दिवस सोलापूरकर कधीच विसरणार नाहीत. याच दिवशी शहरात कोरोनाचा शिरकाव झाला.

पाच्छा पेठेतील किराणा दुकानदाराचा अहवाल पॉझिटिव्ह येताच परिसर सील करण्यात आला. कोरोनाचा हा संसर्ग किती भयानक असेल, याचा अंदाज त्याच दिवशी शहरवासीयांना आला. वर्षभरापासून कोरोनाने आपली साथसंगत सोडलेली नाही. त्यामुळे वर्षभरात प्रत्येकाचं जगणंच बदलून टाकलं. थांबलेला व्यापार अन्‌ सर्वसामान्यांचा रोजगारही वर्षभरात पाहावयास मिळाला.

पाच्छापेठेतील किराणा दुकानदार आजारी पडल्याचे निमित्त झाले. खासगी दवाखान्यात त्यांना न्युमोनिया झाल्याचे सांगितले व पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर त्यांचा मृत्यू झाला. १२ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता पुण्याच्या प्रयोगशाळेकडून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस, आरोग्य प्रशासनाची बैठक होऊन सोलापुरातील पहिले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पाच्छापेठेची घोषणा करण्यात आली.

दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या ९९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यांनी पहिल्यांदा ज्या खासगी रुग्णालयात उपचार घेतला तेथील स्वागतिकेलाही बाधा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १४ दिवस उपचार करण्यात आले. सोलापुरातील हा दुसरा रुग्ण पहिल्यांदा कोरोनामुक्त झाला. त्यानंतर रुग्ण वाढत गेले.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या घराचा तीन किलोमीटर परिसर पहिल्यांदा सील करण्यात येत होता. त्यानंतर रुग्ण वाढेल तसे निकष बदलत गेले. कोरोना महामारीमुळे घोषित केलेला लॉकडाऊन व प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत असल्याने राेजंदारी व हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले. अनेकांच्या व्यवसायाबरोबर जगण्यातही बदल झाला. ज्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागले त्यांना मोठा आर्थिक फटका बसला तर ज्यांच्या घरातील कर्ता माणूस कोरोनाने गेला त्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. वर्षभरानंतर लस आली तरीही कोरोनाचा उद्रेक थांबलेला नाही. त्यामुळे काळजी हाच उपचार याचे ज्ञान सर्वसामान्यांना आले आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनची आहे सर्वत्र टंचाई

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यावर बाधित रुग्णांवर कोणते उपचार करावेत, याबाबत सुरुवातीला गोंधळ होता. पण रुग्ण बरे होईल तसे डॉक्टरांना औषधाच्या परिणामाचा अंदाज आला. संसर्गाचा प्रभाव शोधण्यासाठी एक्सरे, स्कोअर तपासण्यासाठी सिटीस्कॅनचा वापर सुरू झाला. मधुमेही रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपयुक्त ठरत आहे हे लक्षात आल्यावर याची मागणी वाढली. आता एप्रिलमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या इंजेक्शनची सर्वत्र टंचाई भासत आहे.

कोविड सेंटर वाढविण्याची गरज

सध्या जिल्ह्यात १५ कोविड केअर सेंटर असून क्षमता २,५६३ आहे. क्वारंटाईन सेंटर ८ असून क्षमता २ हजार इतकी आहे. उपचार केंद्र ३६ असून ३२ सुरू आहेत. हॉस्पिटल २६ असून २५ सुरू आहेत. सीसीसी बेड क्षमता १० हजार ९२५ इतकी असून ऑक्सिजन बेड १ हजार ३०१ तर आयसीयू बेड ६०७ व व्हेंटीलेटर बेड २०९ इतके आहेत.

मार्च व एप्रिलमद्ये कोराेनाचा संसर्ग दुपटीने वाढला असून, कोविड हॉस्पिटलमध्ये बेडची टंचाई निर्माण झाली आहे. रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची बेडची आवश्यकता भासत आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारासाठी खासगी दवाखान्यातही बेड शिल्लक नाहीत. पूर्वी झालेेले नियोजन ढासळले आहे.

दुसरा पॉझिटिव्ह कोरोनामुक्त होऊन आरोग्य सेवेत व्यस्त

१ सोलापुरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह १२ एप्रिल रोजी आढळला. किराणा दुकानदाराच्या मृत्यूनंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांचा संपर्क शोधल्यानंतर खासगी दवाखान्यातील स्वागतिका पॉझिटिव्ह आढळली होती.

२ या स्वागतिकेने सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये १४ दिवस उपचार घेतले अन दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण पहिल्यांदा कोरोनामुक्त झाला. यावेळी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आनंद व्यक्त केला व त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे बळ वाढले.

३ कोरोनामुक्त झाल्यानंतर त्या स्वागतिकेने आपली आरोग्य विभागातील सेवा पूर्वतत सुरू केली. कोरोना संसर्गाचा सुरुवातीचाच काळ असल्याने अशा रुग्णांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा होता; पण तरीही तिने काम सुरूच ठेवले.

१२ एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला

  • कोरोनाचे एकूण रुग्ण - ७०,०३८
  • बरे झालेले रुग्ण - ५९,५४३
  • एकूण कोरोना बळी - २,०९०
  • सध्या उपचार सुरू असलेले - १९,५३०
  • कोविड सेंटर्स संख्या - १५

असे वाढले रुग्ण - 

  • मार्च २०२०: ००
  • एप्रिल: १०७
  • मे: ८७९
  • जून: १,७६९
  • जुलै: ५,९६८
  • ऑगस्ट: ९,५१६
  • सप्टेंबर: १५,३०९
  • ऑक्टोबर: ७,०८४
  • नोव्हेंबर: ५,२५४
  • डिसेंबर: ३,२७३
  • जानेवारी २०२१: २,५४१
  • फेब्रुवारी: २,०२३
  • मार्च: ८,७६१
  • १० एप्रिल: ८,१८८

Web Title: One year to the epidemic; Throughout the year, Corona changed the lives of Solapurkars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.