अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 19:43 IST2025-07-27T19:40:07+5:302025-07-27T19:43:15+5:30

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तीन वर्षांपासून हे काम सुरू असून, मध्ये गळती लागल्याने कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Oh my... Even God's work is not done properly! Despite spending Rs 50 crores in three years, the roof of the Vitthal-Rukmini temple still leaks | अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती

अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती

Vitthal Rukmini Mandir Pandharpur Latest News: पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पुरातन सौंदर्य जतन व संवर्धन करण्याचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून सुरू आहे. या मंदिर संवर्धनासाठी गेल्या तीन वर्षात ५० कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च झाली आहे. मात्र, मंदिराच्या छतावरील गळती थांबवण्यात मंदिर समिती यशस्वी झालेली नाही. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या पावसामुळे मंदिराच्या छताला मोठी गळती लागली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने सुमारे १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. सन २०२३ पासून या कामाला सुरुवात झाली आहे.

आराखड्यात विठ्ठल मंदिर, सभामंडप, शिखर, रुक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, नामदेव पायरी, नगारखाना, बाजीराव पडसाळ, विनायक मंदिर, व्यंकटेश मंदिर, टेन्साईल वर्क (आतील व बाहेरील), दर्शनबारी, स्ट्रक्चरल ऑडिट, वॉटर सप्लाय व ड्रेनेज, इलेक्ट्रिकल वर्क, साऊंड सिस्टीम, फायर फायटिंग सिस्टीम, लक्ष्मण पाटील देवस्थान, अंबाबाई मंदिर, श्री रोकडोबा मंदिर, श्री सोमेश्वर मंदिर, सभामंडप सागवाणी काम, इतर परिवार देवता मंदिरे तसेच संत नामदेव महाद्वार यांच्यासह अनेक कामांचा समावेश आहे.

भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली गेल्या तीन वर्षापासून ही कामे सुरू आहेत. तथापि, ही कामे अतिशय संथगतीने केली जात आहेत, अशी तक्रार वारकरी संघटना आणि इतर सामाजिक संघटनांनी केली आहे.

महाजन यांनी केली पाहणी

विठ्ठल मंदिरात झालेल्या गळतीच्या भागाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रशासनाला दर्जेदार काम करण्याची सूचना केली. यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

पावसाळा लवकर सुरू झाला; पुरातत्त्व विभागास समितीचा पत्रव्यवहार

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन, संवर्धन व जीर्णोद्वाराची कामे शासन निधीतून पुरातत्त्व विभागामार्फत १६ डिसेंबर २०२३ पासून सुरू करण्यात आली आहेत. या कामाचे पर्यवेक्षण करून गुणवत्तापूर्ण कामे पुरातत्त्व विभागामार्फत करून घेण्यात येत आहेत. 

तथापि, २२ व २६ जुलै रोजी मंदिरात मुसळधार पावसाने गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुरातत्त्व विभागास २२ व २६ जुलै रोजी पत्रव्यवहार करून कळविण्यात आले आहे. मंदिर समितीच्या वेळोवेळी झालेल्या सभेमध्ये आढावा घेण्यात येत आहे व तशा सूचना पुरातत्त्व विभाग व कंत्राटदार यांना देण्यात आल्या. 

याशिवाय, यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्याने वॉटरप्रूफिंगची कामे वेळेत पूर्ण करता आली नाहीत, असे पुरातत्त्व विभागाने कळवले आहे. परंतु, गळती होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात आलेल्या आहेत. आराखड्यातील सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत व आतापर्यंत झालेल्या कामाचे त्रयस्थ शासकीय संस्थेकडून ऑडिट करणेबाबत मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांना प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

'आम्ही वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या आहेत, परंतु कोणीही त्या गांभीर्याने घेत नाही. गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूरमध्ये हलका पाऊस पडत आहे, ज्यामुळे मंदिराच्या बहुतांश छताला गळती झाली आहे. इतरही कामे निकृष्ट दर्जाची सुरू आहेत. शासनाने १५० कोटी रुपयांच्या या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी', अशी मागणी महर्षी वाल्मिकी महासंघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे.

Web Title: Oh my... Even God's work is not done properly! Despite spending Rs 50 crores in three years, the roof of the Vitthal-Rukmini temple still leaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.