नवीन काँक्रीट रस्त्यावरून पवनचक्कीचे पंखे वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांवर गुन्हे
By प्रताप राठोड | Updated: April 9, 2023 13:50 IST2023-04-09T13:49:55+5:302023-04-09T13:50:10+5:30
टेंभुर्णी येथे करमाळा चौक ते बारवे मळा या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाकडून नवीन सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे.

नवीन काँक्रीट रस्त्यावरून पवनचक्कीचे पंखे वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांवर गुन्हे
टेंभुर्णी (जि. सोलापूर ) येथे करमाळा चौक ते बारवे मळा या दरम्यान नवीन तयार केलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रोडवर अवजड वाहनांना बंदी असताना देखील या मार्गावरून पवनचक्कीचे पंखे वाहतूक करणाऱ्या सहा ट्रक चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत महामार्गाचे अधिकारी मोहित धीर सिंह यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
टेंभुर्णी येथे करमाळा चौक ते बारवे मळा या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाकडून नवीन सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांना जाण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही या मार्गावरून पवनचक्कीचे पंखे वाहतूक करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली आहे. रस्ता नवीन असल्यामुळे यावरून जड वाहतूक गेल्यामुळे तयार करण्यात आलेल्या रस्ता खराब झाला आहे. यामुळे जवळपास पंधरा लाखाचे नुकसान झाल्याचे फिर्यादित म्हटले आहे. यामुळे सहा ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.