The number of corona patients increased in September in the city of Solapur due to disorder | बेशिस्तीमुळे सोलापूर शहरात सप्टेंबर महिन्यात वाढले कोरोनाचे रूग्ण

बेशिस्तीमुळे सोलापूर शहरात सप्टेंबर महिन्यात वाढले कोरोनाचे रूग्ण

ठळक मुद्देसप्टेंबर महिन्यात उत्सव आणि इतर कारणांमुळे लोकांनी एकाच ठिकाणी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.मागील महिन्याच्या तुलनेत रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढली आहे.

सोलापूर :  शहरात आॅगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित मृतांची आणि रुग्णांची संख्या वाढली आहे; मात्र ही संख्या जून आणि जुलैच्या तुलनेत कमी आहे. वाढती संख्या पाहून प्रशासनाने दंडात्मक कारवाईसह नवे प्रतिबंध लावण्यावर विचार सुरू केला आहे.

शहरात १२ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. मे, जून, जुलै महिन्यात कोरोनाचा कहर झाला होता. त्याला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आणि त्यांच्या टीमने केले. आॅगस्ट महिन्यात प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत होते. फेब्रुवारी महिन्यात शहरात ३७ तर मार्च महिन्यात ३३ चाचण्या झाल्या. यातून एकही रुग्ण आढळून आला नाही.

एप्रिल महिन्यात १७०२ चाचण्यांमध्ये १०५, मे महिन्यात ६ हजार ६५६ चाचण्यांमध्ये ८४१, जून महिन्यात ५ हजार ६०४ चाचण्यांमध्ये १४४८ रुग्ण आढळून आले. जुलै महिन्यात स्वॅब टेस्टसोबतच अँटिजेन टेस्टही करण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यात २२ हजार ३३५ चाचण्यांमधून १४९१ रुग्ण आढळून आले. आॅगस्ट महिन्यात २५ हजार ५३४ चाचण्यांमधून १ हजार ६४५ रुग्ण आढळून आले. सप्टेंबर महिन्यात २९ सप्टेंबरअखेर १५ हजार ३०७ चाचण्यांमधून १७०० रुग्ण आढळून आले आहेत. आॅगस्ट महिन्यात रुग्ण आढळून येण्याचा दर २३ टक्क्याजवळ होता. सप्टेंबर महिन्यात कमी चाचण्या होऊनही तो ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

सप्टेंबर महिन्यात उत्सव आणि इतर कारणांमुळे लोकांनी एकाच ठिकाणी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यामुळे मागील महिन्याच्या तुलनेत रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढली आहे. नागरिकांनी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. अन्यथा कठोर कारवाई करावीच लागेल.
- पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा. 

Web Title: The number of corona patients increased in September in the city of Solapur due to disorder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.