Good News; आता सोलापूर विभागातील शेतकºयांनाही मिळणार किसान रेलची सेवा
By Appasaheb.patil | Updated: August 20, 2020 14:29 IST2020-08-20T14:28:04+5:302020-08-20T14:29:52+5:30
मध्य रेल्वे: रोड वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीचे भाडे कमी, जलद व सुरक्षित माल पोहोचणार

Good News; आता सोलापूर विभागातील शेतकºयांनाही मिळणार किसान रेलची सेवा
सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील शेतकºयांच्या शेतात पिकविलेला माल आता जलद व कमी खर्चात हव्या त्या ठिकाणी पोहोचविणे सोपे झाले आहे़ दरम्यान, २१ आॅगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर भारतीय रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेली किसान रेल सोलापूर विभागातून प्रयागराज चौकी, न्यू चौकी (अलाहाबाद चौकी), दीनदयाल उपाध्याय (मुघलसराय), बक्सर, दानापूर (पटणा) आणि मुझफ्फरपूरपर्यंत धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा सुरू केली़ या रेल्वेतून भाजीपाला आणि फळांची वाहतूक करण्यात येणार आहे. सोलापूर आणि पुणे विभागामधील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर परिसरातील शेतकरी डाळिंब, केळी, द्राक्षे इत्यादी फळे, भाजीपाला, फुले, कांदे अशा शेतमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात़ ही ट्रेन छोटे शेतकरी आणि छोट्या व्यापाºयांच्या कृषी उत्पादनाच्या वाहतुकीची गरज भागविणार आहे. मार्गावरील सर्व थांब्यांवर नाशवंत मालाची लोडिंग आणि अनलोडिंग करण्याची परवानगी दिली आहे. ही सेवा सुरुवातीला आठवड्यातून एकदा असणार आहे.
असा असेल किसान रेलचा प्रवास
किसान रेल प्रारंभी कोल्हापूरहून निघेल. मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड आणि अहमदनगर या स्थानकांवर थांबेल. सदर गाडीचे डबे गाडी क्र. ००१०७/ ००१०८ देवळाली-मुझफ्फरपूर-देवळाली गाडीला मनमाड रेल्वे स्थानकावर जोडले व काढले जातील. यामुळे प्रयागराज चौकी, न्यू चौकी (अलाहाबाद चौकी), दीनदयाल उपाध्याय (मुघलसराय), बक्सर, दानापूर (पटणा) आणि मुझफ्फरपूर या परिसरात नाशवंत कृषी माल पाठविण्यात येणार आहे़ यामुळे शेतकरी आणि व्यापाºयांचा माल सुरक्षित आणि जलदगतीने पोहोचविण्यात रेल्वे प्रशासन यशस्वी ठरणार आहे़
चोरी रोखण्यासाठी आरपीएफ जवान तैनात
या किसान रेलमध्ये असलेल्या प्रत्येक कृषी मालाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असणार आहे. या पार्सल विशेष गाडीमध्ये कोणत्याही पॅसेंजरना प्रवेश देण्यात येणार नाही. दरम्यान, रेल्वे गाडीत चोरीसारख्या घटना घडू नये, शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठी आरपीएफ पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली़