छत्रपतींचा इतिहास जपण्याची गरज, अमोल कोल्हे यांचे मत, शिवरायांचा इतिहास महाराष्टÑाबाहेर समजला जावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 11:12 IST2018-02-01T11:10:09+5:302018-02-01T11:12:55+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही अष्टपैलू व्यक्तिमत्त्वं असून त्यांचा इतिहास हा सतत जागता ठेवत जपण्याची गरज आहे

छत्रपतींचा इतिहास जपण्याची गरज, अमोल कोल्हे यांचे मत, शिवरायांचा इतिहास महाराष्टÑाबाहेर समजला जावा
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही अष्टपैलू व्यक्तिमत्त्वं असून त्यांचा इतिहास हा सतत जागता ठेवत जपण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘ शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातील संभाजीची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
महानाट्याच्या प्रयोगानिमित्ताने सोलापुरात आलेले डॉ. कोल्हे यांनी बुधवारी लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे व मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधीचे प्रमुख ओमप्रकाश शेटे हेही उपस्थित होते. इतिहास हा केवळ मढी उकरण्यासारखा नसून त्यातून काहीतरी शिकले पाहिजे, असे सांगून अमोल कोल्हे म्हणाले की, शिवरायांच्या राजनीती, व्यवस्थापन, ध्येयनिष्ठा आदी कितीतरी गोष्टी आजच्या काळात उपयुक्त आहेत.
ज्या शिवरायांना आपण दैवत मानतो ते शिवराय महाराष्टÑापलीकडे फारसे माहीत नाहीत, अशी खंत व्यक्त करताना आपल्या शालेय अभ्यासक्रमातही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे कोल्हे यांनी सांगितले. आपल्या अभ्यासक्रमात मुसोलिनी, नेपोलियन, फ्रेंच राज्यक्रांती शिकविली जाते; पण शिवरायांचा इतिहास दुर्लक्षित केला जातो हे कटूसत्य आहे, असे ते म्हणाले.
छत्रपती संभाजीची भूमिका हा माझा ड्रीम रोल होता. त्यात पूर्ण क्षमतेने जीव ओतत आहे. सलग १८ वर्षे एका शहेनशहाची झोप उडवणाºया शिवपुत्राचा इतिहास नव्या पिढीला समजणे गरजेचे असून त्यासाठी या नाट्याच्या व मालिकेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांची विचार करण्याची पद्धत आणि क्रम बदलले असल्याने ते अवघड असले तरी खारीचा वाटा म्हणून आम्ही तो इतिहास जागता ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. छत्रपतींचा इतिहास व्यापक पातळीवर पोहोचण्यासाठी शिवप्रेमींनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रारंभी लोकमतचे संपादक राजा माने यांनी डॉ. कोल्हे व शेटे यांचा सत्कार केला. डॉ. शिवरत्न शेटे यांचा सत्कार सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी केला.
----------------------
बिनपैशाचं खातं सांभाळण्याची जबाबदारी आली असली तरी लोकमतसारख्या मीडियामुळे दिलासा मिळाला. दररोज चारशे रुग्ण भेटतात पण कधीही थकवा जाणवत नाही. अडल्या-नडल्या लोकांना मदत केल्याचं फार मोठं समाधान मिळतं, त्यामुळे आतापर्यंत २१ लाख लोकांपर्यंत पोहोचून एक हजार कोटींची मदत वाटप करणे शक्य झाले.
- ओमप्रकाश शेटे, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचे प्रमुख