गॅस दरवाढीविरुद्ध राष्ट्रवादी आक्रमक; सोलापुरात भजन म्हणत फोडला भोपळा
By Appasaheb.patil | Updated: March 10, 2023 14:16 IST2023-03-10T14:15:55+5:302023-03-10T14:16:23+5:30
जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने हे आंदोलन केले

गॅस दरवाढीविरुद्ध राष्ट्रवादी आक्रमक; सोलापुरात भजन म्हणत फोडला भोपळा
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : गॅस दरवाढ अन् अर्थसंकल्पात फक्त करण्यात आलेल्या घोषणांचा पाऊस या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने अनोखे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. टाळ, मृदंगाच्या गजरात भजन म्हणत भोपळाही यावेळी फोडला. याचवेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने हे आंदोलन केले. अर्थसंकल्पात भोपळा देणार्या महाराष्ट्र सरकारचा निषेध असो..निषेध असो अशा घोषणा महिला पदाधिकारी यांनी दिल्या. यावेळी विविध महिला पदाधिकारी यांनी आपल्या भाषणात सरकारने केलेली महागाई, वाढविलेली बेरोजगारी, महिलांच्या पदरी निराशा, शेतकरी आत्महत्या, पिकांना भाव नाही, गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ यामुळे महिलांचे किचनमधील बजेट कोलमडलेले आहे. मोदी सरकारकाळात महागाई वाढल्याचा आरोपही महिलांनी केला. हे विठ्ठला आमच्या पंतप्रधान मोदी साहेबांना गॅस सिलेंडरचे भाव कमी करण्यासाठी सदबुध्दी दे असा संदेश देणारा फलकही महिला पदाधिकारी यांनी आंदोलनस्थळी लावला होता. यावेळी महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.