मोबाईल आणि ड्रायव्हिंग धोकादायकच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 05:05 PM2019-03-26T17:05:39+5:302019-03-26T17:06:06+5:30

काही वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. सायंकाळी ७ वाजता माझ्याकडे एक तरुण रुग्ण आला, आला कुठला उचलूनच आणला होता त्याला चार ...

Mobile and driving are dangerous ... | मोबाईल आणि ड्रायव्हिंग धोकादायकच...

मोबाईल आणि ड्रायव्हिंग धोकादायकच...

Next

काही वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. सायंकाळी ७ वाजता माझ्याकडे एक तरुण रुग्ण आला, आला कुठला उचलूनच आणला होता त्याला चार जणांनी. पांढराफटक पडला होता तो. नाडी नीट लागत नव्हती. अर्धवट शुद्धीत होता. रक्तदाब खूपच कमी झाला होता. पोटाला मार लागला होता त्याच्या. पोटात खूप रक्तस्त्राव झाला होता.चटकन त्याला दोन ठिकाणी सलाईन लावून पटकन काही लिटर सलाईन दिले. तोपर्यंत रक्ताच्या बाटल्यांची तयारी करून घेतली होती.

रक्ताची बाटलीही लावली पण त्याचा रक्तदाब काही वाढत नव्हता. याचाच अर्थ पोटात जोरदार रक्तस्त्राव होत होता. जिवाला धोका होता. वेळ न दवडता मी त्वरित रुग्णाला स्ट्रेचरवरुन ओटीत पळविले. अगदी मी स्वत: ट्रॉली ढकलत नेली. गडबड करुन भूल देणाºया डॉक्टरांना भूल द्यायला लावली. पोटावर छेद घेतला तो काय, पोटात रक्ताचे तळेच साचले होते. दोन्ही सलाईनच्या नळ्यातून आता सलाईन नव्हे तर फक्त रक्तच देत होतो आम्ही. पोटातले रक्त सक्शनने काढल्यानंतर लक्षात आले की या तरुणाच्या बरगड्या तुटल्याने आणि बरगड्या लिव्हरमध्ये घुसल्याने, लिव्हरला बरीच मोठी अशी जखम झालेली आहे व त्यातूतन रक्तस्त्राव होतो आहे.  रक्तस्त्राव थांबविण्यासाठी मग लिव्हरवर टाके घेतले. हळूहळू रक्तस्त्राव कमी झाला आणि थांबलाही. मी सुटकेचा निश्वास सोडला. काही वेळात त्याचा रक्तदाबही नॉर्मल झाला. आॅपरेशन नंतर पूर्ण बरा होऊन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यासाठी मात्र दहा दिवस लागले. नंतर चर्चा करताना असे कळाले की महाशय  टू व्हिलर चालवित होते. कानाला ब्लूटूथ लावून छानपैकी गप्पा मारत मारत समोर उभ्या असलेल्या पाण्याच्या एका  टँकरला त्याने स्वत:च धडक दिली आणि पुढचे महाभारत घडले.

वाहन चालवताना मोबाईलचा वापर  शंभर टक्के अपघाताला आमंत्रण देणार यात शंका नाही. आपल्याकडे आजकाल  फॅशनच आलेली आहे. टू व्हिलर चालवताना किंवा कार चालवितानाही मोबाईल कान आणि खांद्याचा चिमटा करुन बोलतच रहायचे, किंवा  मस्त हँड्स फ्री ब्लूटूथ डिव्हाइसेस वापरायचे, ते वापरूनच वाहन चालवायचे. अगदी घरी पोहोचेपर्यंत  मोबाईलवर बोलत  बोलतच वाहन चालवायचे. मोबाईलवर बोलत असताना वाहनाचा वेगही नेहमी इतकाच ठेवायचा. तो अजिबात कमी करायचा नाही. किंबहुना तीच गोष्ट अभिमानाने करावयाची. ईअरफोन वापरणाºयांची तर बातही कुछ अलग है. मुली असतील तर स्कार्फच्या आत ईअरफोन लपवतात. मुले आजकाल हेल्मेटचा सहारा घेतात. शेजारुन जाणाºया बिचाºया व्यक्तींना हे कळत नाही की हे शिरस्त्राणधारी नक्की कोणाशी गप्पा मारताहेत.

समोरुन येणाºया  बºयाच मुलांना मुलींकडे पाहून असे वाटते की, त्या त्यांच्याशीच बोलताहेत. पण काही वेळाने त्यांचा भ्रमनिरास होतो. काही कलाकार तर कारचे स्टेअरिंग म्हणजे जणूकाही मोबाईल स्टँड आहे अशा पध्दतीने वापरतात. कार चालविताना स्टेअरिंगवर मोबाईल ठेवून मेसेज करणारे किंवा अगदी व्हॉट्सअप बघणारे महाभागही काही कमी नाहीत. कार चालवताना मोबाईलवर बोलणे ही तर जणू अनेकांना अभिमानाची गोष्ट वाटते. पोलिसांनाही कोणी दाद देत नाही आजकाल. 

ट्रिप्सी म्हणजेच ट्रिपल सीट जाणाºयांची तर मैत्री ऊतू चाललेली असते. वाहन चालवणाºयांची सेवा सीटवर सर्वात शेवटी बसलेला तिसरा माणूस करीत असतो. त्याच्या कानाला मोबाईल लावून. बाईक चालवणाराही रुबाबात दुचाकी चालवित असतो, मोबाईलवर बोलत बोलत, जणू मोबाईल पकडण्यासाठी पैसे देऊन माणूस ठेवलाय. पतीची सेवा करणाºया पण कैक महिला आहेत. पतीच्या मागे दुचाकीवर बसून त्याच्या कानाला मोबाईल लावून त्याची ईमानेईतबारे सेवा बजावणाºया महिलाही अनेकदा दिसतात. या आपल्या सेवेमुळे कदाचित आपला नवरा पुन्हा दुचाकी चालवायच्या लायकीचा राहणार नाही हे मात्र त्यांच्या का लक्षात येत नाही कोण जाणे.
खरेतर उपाय किती सोपा आहे, महत्त्वाचा फोन असेल तर एखादा मिनिट थांबा, वाहन बाजूला घ्या  मगच फोनवर बोला. वाहन चालवत असताना मोबाईल वरती बोलण्यामुळे चित्त विचलित होते. एका सर्वेक्षणानुसार कार ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरणाºयांचा अपघात होण्याचा तब्बल २४ पट अधिक धोका आहे. म्हणून कितीही महत्त्वाचा कॉल असू दे ,दुर्लक्ष केलेलेच केव्हाही बरे.अन्यथा लवकरच भेटू यात आय.सी.यु.त.
- डॉ. सचिन जम्मा
(लेखक लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत)

Web Title: Mobile and driving are dangerous ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.