आमदार आदर्श ग्राम योजनेला ठेंगा
By Admin | Updated: July 17, 2015 16:53 IST2015-07-17T16:53:29+5:302015-07-17T16:53:29+5:30
केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना राबविण्याचा 'फडणवीस सरकार'ने निर्णय घेतला असला तरी सोलापूर जिल्ह्यातील १४ आमदारांनी याला ठेंगा दाखविला आहे.

आमदार आदर्श ग्राम योजनेला ठेंगा
>आमदारांची उदासीनता: निवडायच्या आहेत तीन ग्रामपंचायती
शिवाजी सुरवसे■ सोलापूर
केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना राबविण्याचा 'फडणवीस सरकार'ने निर्णय घेतला असला तरी सोलापूर जिल्ह्यातील १४ आमदारांनी याला ठेंगा दाखविला आहे.
प्रत्येक आमदाराने तीन ग्रामपंचायती २0१९ पर्यंत आदर्श करावयाच्या आहेत. याबाबत २0 मे रोजी शासन निर्णय निघाला. दोन महिने झाले तरीही एकाही आमदार महोदयांनी ग्रामपंचायती निवडल्या नाहीत. त्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे नावे देणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यात विधानसभेचे ११ आणि विधानपरिषदेचे तीन आमदार आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी खासदारांसाठी आदर्श संसद ग्राम योजना सुरू केली. जिल्ह्यातील खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढा तालुक्यातील तुळशी हे गाव तर खासदार शरद बनसोडे यांनी पंढरपूर तालुक्यातील येवती ही गावे निवडली आहेत. एक वर्ष झाले. या गावांना आदर्श करण्यासाठी वारंवार बैठका झाल्या, त्यानुसार काही कामेही सुरू झाली आहेत. आता राज्य शासनाच्या २0 मे २0१५ रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून आमदार आदर्श ग्राम योजनेचा आदेश काढण्यात आला आहे. सर्व आमदारांना हा आदेश देखील पाठविण्यात आला आहे. आमदारांनी आपल्या मतदारसंघातील तीन ग्रामपंचायती आदर्श ग्राम म्हणून २0१९ पर्यंत विकसित करावयाची आहेत. निवडलेल्या गावांमध्ये आमदार निधीबरोबच शासनाकडून देखील विकासकामांसाठी वेगळा निधी मिळणार आहे. या गावांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या अस्तित्वात असलेल्या विविध योजनांची संयुक्त अंमलबजावणी या गावात केली जाणार आहे. गावे निवडावयाचे निकष
■ आमदारांनी स्वत:चे किंवा त्यांच्या पती/पत्नीचे गाव निवडू नये
■ त्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या किमान एक हजार असावी
■ मतदारसंघ पूर्णपणे शहरी भागात असेल तर आमदारांनी जिल्ह्यातील कोणतीही एक ग्रामपंचायत निवडावी
■ मतदारसंघ शहरी व ग्रामीण भागात विभागला असल्यास मतदारसंघाच्या ग्रामीण भागातून ग्रामपंचायतींची निवड करावी
■ विधानपरिषद सदस्य कोणत्याही जिल्ह्यातून ग्रामपंचायतीची निवड करु शकतील.