मेघदूत.. रसिक, साहित्यिक अन् चित्रकारांचे आकर्षण!
By Admin | Updated: July 17, 2015 16:58 IST2015-07-17T16:58:47+5:302015-07-17T16:58:47+5:30
सोलापुरात दरवर्षी कालिदास दिवस मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. लोकमंगल समूहाने २६५ शहर आणि जिल्ह्यामध्ये २६५ कविसंमेलनाचे आयोजन केले आहे

मेघदूत.. रसिक, साहित्यिक अन् चित्रकारांचे आकर्षण!
>सोलापूर - सोलापुरात दरवर्षी कालिदास दिवस मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. लोकमंगल समूहाने २६५ शहर आणि जिल्ह्यामध्ये २६५ कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने १७ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहात 'मला भावलेले पुस्तक' हा उपक्रम कालिदास दिनाचे औचित्य साधून घेतला आहे. शिवाय आर्यनंदी परिवाराच्या वतीनेही काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रवींद्र देशमुख■ सोलापूर
भारतीय कवींनी कालिदासाला आपल्या कुळाच्या गुरूचे स्थान दिले आहे. कालिदासांच्या मेघदूत या खंडकाव्याने जगभरातील रसिक वाचकांना भुरळ घातलेली आहे. मराठी साहित्यात 'मेघदूता'चा अनुवाद आणि रसग्रहणावर अजोड कार्य झालेले आहे. कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, चिंतामणराव देशमुख, शांता शेळकेंपासून सोलापूरच्या विजया जहागीरदारांपर्यंतच्या सर्व सिद्धहस्त साहित्यिकांनी वाचकांना आपापल्या शैलीतून या अजरामर महाकाव्याची मधाळ गोडी चाखायला दिलेली आहे. याशिवाय चित्रकारांनाही या महाकाव्यातील निसर्गाने आकर्षित केलेले आहे.
आषाढाचा पहिला दिवस भारतीय साहित्य क्षेत्रामध्ये कालिदास दिवस म्हणून साजरा केला जातो. मेघदूत हे महाकाव्य कालिदासाने गुप्तकाळात लिहिले असल्याचे मानले जाते. या जगप्रसिद्ध काव्यात आहे तरी काय?.. पत्नी विरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने आपल्या प्रियेला अर्थात यक्षिणीला मेघाबरोबर धाडलेल्या संदेशाच्या कल्पनेचा आधार घेत कालिदासाने हे महाकाव्य लिहिले आहे. यक्षाची पत्नी दूर गेल्यामुळे त्याचं जीवन एकाकी झालेलं असतं. ज्या रामगिरी पर्वतावर त्याचे वास्तव्य असतं, तोही निर्जन असतो. विरहभावनेचा कडेलोट यक्षाला मेघ दिसतो.. आषाढाचा पहिला दिवस असतो तो. मेघाला आपली विरह कहाणी सांगत यक्ष त्याला अलकानगरीला जाण्याची विनंती करतो.. कालिदासाने सर्मपक शब्दांमध्ये विरहभावना मांडली आहे. कालिदासाचे भाषामाधुर्य रसिकाला 'मेघदूता'च्या प्रेमात पाडते.
मराठी साहित्यामध्ये मेघदूताचे पद्य अनुवाद रा. प. सबनीस, कृष्णशास्त्री चिपळूणकर, डॉ. श्रीखंडे, कात्रे, ना.ग. गोरे, वसंतराव पटवर्धन, बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, द.वें. केतकर, अ.ज. विद्वांस यांनी केले आहेत. यापैकी चिंतामणराव देशमुख, ग.वि. कात्रे, बा.भ. बोरकर, द.वें. केतकर व अ.ज. विद्वांस या पाच जणांनी मेघदूताच्या मूळ मंदाक्रांत या वृत्तातच मराठीतून काव्यानुवाद केला आहे; तर अन्य लेखकांनी इतर वृत्तातून अनुवाद केले आहेत.
कालिदासाने 'मेघदूता'मध्ये निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे. कविकुलगुरुंच्या या वर्णनाने चित्रकारांना भुरळ पाडली आहे. त्यावर आधारित अनेक चित्रकारांनी आपल्या कुंचल्याचा आविष्कार दाखविला आहे. पुण्याचे चित्रकार नाना जोशी यांची मेघदूतावरील नऊ चित्रे प्रसिद्ध आहेत. राजा रविवर्मा यांनीही 'मेघदूता'वर दोन चित्रे रेखाटली आहेत. कालिदासाचे साहित्य ■ महाकाव्ये : रघुवंश, कुमारसंभव
■ खंडकाव्ये : मेघदूत, ऋतूसंहार
■ नाटके : मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, शाकुंतल.
■ ग्रंथ : कुंतलेश्वरदौत्य
अलकानगरीपर्यंतचा मार्ग सांगताना मेघाला यक्ष म्हणतो, तू जेव्हा मार्गस्थ असशील तेव्हा सुवर्णकेशरी रंगाचा आम्रकुट पर्वत तुझ्या स्वागताला सज्ज असेल. तुला मोराच्या आर्त केकाही ऐकायला मिळतील. या मार्गात तुला विंध्य पर्वताच्या अंगावर पसरलेली अवखळ नर्मदा दिसेल. नर्मदेत डुंबणारे रानहत्ती, पाण्यात मिसळणारा त्यांचा मधगंध. या गंधमधाचं पाणी पिऊन वार्यालाही न जुमानता पुढे जा. शुभ्र बगळ्यांच्या माळा तुझी साथ करतील. वाटेवरची केतकीची बनं तुझा थकवा घालविण्यासाठी सुगंध उत्सजिर्त करतील.