कोरोनामुक्तीसाठी दुवा; रमजान महिन्यातील नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 15:38 IST2021-04-13T15:38:29+5:302021-04-13T15:38:35+5:30
पहिला रोजा बुधवार १४ एप्रिल रोजी होईल

कोरोनामुक्तीसाठी दुवा; रमजान महिन्यातील नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन
सोलापूर : रमजान महिना हा अल्लाहच्या कृपेचा महिना आहे. या महिन्यात आम्ही सर्व मिळून अल्लाहकडे दुवा मागणार आहोत. जगावर जे कोरोनाचे संकट आले आहे, त्यापासून सकल मानवजातीची रक्षा करण्यासाठीची प्रार्थना या महिन्याभरात करण्यात येईल. ज्यांना हा आजार झाला आहे ते लवकरात लवकर बरे व्हावेत. हा आजार जगभरातून जावा, अशी दुवा मागण्यात येईल, अशी भावना शहर काझी अमजद अली यांनी व्यक्त केली. शासन आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनेनुसार नियमांचे पालन करत रमजानची नमाज घरीच अदा करा, असेही आवाहन त्यांने केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. शासनाने वेळोवेळी जाहीर केलेले नियम सर्वांच्या काळजीपोटीच तयार केले आहेत. या निर्णयाचे पालन सर्वजण करतील, असा विश्वास काझी यांनी व्यक्त केला. रमजान महिन्यात रात्री तरावीहची नमाज अदा करण्यास विशेष महत्त्व आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे रात्री ८ नंतर निर्बंध घालण्यात आले आहेत. ती वेळ एक तासापर्यंत म्हणजेच रात्री नऊपर्यंत वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.
आज पहिली तरावीह
सोमवार १२ एप्रिल रोजी सोलापूर तसेच देशभरामध्ये चंद्रदर्शन झाले नाही. त्यामुळे तरावीह १३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पहिला रोजा बुधवार १४ एप्रिल रोजी होईल, अशी माहिती शहर काझी यांनी दिली.
आदेशाचे पालन करा
नियमाप्रमाणे बाजार बंद असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी होणार नाही. एखादे वैश्विक संकट आल्यास आपण घरीच राहून नमाज अदा करू शकतो. इस्लामचा कायदा शरीयतनुसार अशी मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे गर्दी न करता घरी राहूनच नमाज अदा करावी. राज्य शासनाच्या आदेशाचे सर्वजण पालन करून हा आजार दूर घालविण्यासाठी प्रयत्न करतील, अशा विश्वास शहर काझी यांनी व्यक्त केला.