लिंगायत समाजाचा घंटानाद
By Admin | Updated: August 14, 2014 00:03 IST2014-08-13T23:57:47+5:302014-08-14T00:03:13+5:30
कऱ्हाड : समिती स्थापन करण्याच्या निर्णयाने समाधान

लिंगायत समाजाचा घंटानाद
कऱ्हाड : लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे व अल्पसंख्याक दर्जा मिळावा, यासाठी गत पाच दिवस येथे आमरण उपोषण सुरू असून, आज बुधवारी सकाळी शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी घंटानाद केला. दरम्यान, या मागणीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन समिती स्थापन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांसह कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष समितीच्या वतीने येथील भेदा चौकात दि. ९ पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. विविध मार्गांनी हे आंदोलन सुरू असून, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुर्गाप्पा खुमसे, काका कोयटे, सुनील रुकारी, प्रदीप वाले, सरला पाटील, आदींचे उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांपैकी चौघाजणांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्यांचा ओघ आजही कायम आहे. प्रकाश आवाडे, विजय सगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील, मनोज घोरपडे, प्रकाश वायदंडे, संजय तडाखे, चंद्रकांत साठे, आदींसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
सदाभाऊ खोत म्हणाले, ‘लिंगायत समाजाने न्याय्य मागण्यांसाठी केलेले हे आंदोलन सत्याग्रही मार्गाचे आहे. ऊसदर आंदोलनासाठी आम्ही उसाचे टिपरे हातात घेतले होते. खरं तर सरळ मार्गाने काही होत नसेल तर असा मार्ग अवलंबावा लागतो. मी पाठिंबा द्यायला नव्हे तर तुमच्या हातात हात घालून आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलो आहे. तुम्ही फक्त साद द्या. मी हजर असेन.’
दरम्यान, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आंदोलनस्थळी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. उपोषणकर्त्यांसह अनिल खुंटाळे, शरद मुंढेकर, अशोक संसुद्दी, सुनील महाजन, सविता खुंटाळे यांच्यासह शहर व परिसरातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.