जामगावच्या दृष्टीहीन कलाकाराची दिव्यांगावर मात; घरांच्या भिंती चित्रांनी केल्या बोलक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 17:12 IST2020-12-03T17:12:15+5:302020-12-03T17:12:57+5:30

सरपंच ते मुख्यमंत्र्यांच्या घरांच्या भिंती महेशच्या चित्रांनी बोलक्या केल्या आहेत

Jamgaon's blind artist overcomes paralysis; The walls of the houses are painted | जामगावच्या दृष्टीहीन कलाकाराची दिव्यांगावर मात; घरांच्या भिंती चित्रांनी केल्या बोलक्या

जामगावच्या दृष्टीहीन कलाकाराची दिव्यांगावर मात; घरांच्या भिंती चित्रांनी केल्या बोलक्या

शहाजी फुरडे-पाटील

बार्शी :  अंगी जिद्द, जगण्याची धडपड आणि आत्मविश्वास असला की कोणत्याही संकटाला न घाबरता तोंड देत यशस्वी होता येते. बार्शी तालुक्यात जामगाव (आ). येथे  एका डोळ्याने अंध असलेल्या महेश मस्के या कलाकाराने चित्रकलेतून स्वत:ची वेगळी ओळख पुढे आणली आहे. सरपंच ते मुख्यमंत्र्यांच्या घरांच्या भिंती महेशच्या चित्रांनी बोलक्या केल्या आहेत. अपंगत्वाचा बाऊ करणाऱ्यांपुढे महेश याने आदर्श निर्माण केला आहे. 

 आजवर महेश याने जवळपास चार हजार चित्रं रेखाटली आहेत. घरची परिस्थिती ही बेताचीच होती. आई इंदुबाई  व वडील अशोक यांनी  इतरांच्या शेतात  मोलमजुरी करून महेश व योगेश या दोन मुलांना शिकविले. कलेची सुरुवात जनावरे चारायला घेऊन जात असताना म्हशीच्या पाठीवर, तळ्याच्या काठावर सर्वप्रथम कुंचला गिरवला. पाचवीपासून या कुंचल्याने आणखीनच गती आणि वळणे दिली. या काळात वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होत शाळेमधील फलक लेखन, रांगोळी साकारली. या कलेने आयुष्याचाही रंग गडद केला. टक्के, टोणपे झेलत असताना या कलेला मनसोक्त वेळ देता आले नाही. त्याने दहावी झाल्यानंतर आवडेल त्या विषयात मुक्तसंचार करण्याचा निर्णय  घेतला. अनेक ज्येष्ठांनी यात कुठे करिअर होतंय का? असा सवाल केला.  

 त्यात जन्मत:च एका डोळ्याचे अपंगत्व, त्यामुळे इतरांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा राहिला. तुमचा मुलगा अपंग आहे, तो काही करू शकणार नाही, असे अनेक प्रश्न कुटुंबापुढे उभे केले होते. या खडतर प्रवासातूनही एक वेगळी वाट शोधली. याच कलेने पुढे वेगळी ओळख दिली. उत्कृष्ट कलाकार म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

यांच्या घरांची चित्रांनी वाढवली शोभा 
सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री  या साऱ्यांच्या घरांची शोभा त्यांच्या चित्रांनी वाढवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुप्रिया सुळे, छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले, अभिनेते नाना पाटेकर, प्रवीण तरडे, अमोल कोल्हे अशा अनेकांच्या भेटी त्याने घेतल्या.

Web Title: Jamgaon's blind artist overcomes paralysis; The walls of the houses are painted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.