आंतरजातीय विवाह केला, पण अनुदान काही मिळेना; १५० जोडपी प्रतीक्षेत, वर्षही उलटले
By शीतलकुमार कांबळे | Updated: June 18, 2023 16:58 IST2023-06-18T16:58:34+5:302023-06-18T16:58:55+5:30
आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांना शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते.

आंतरजातीय विवाह केला, पण अनुदान काही मिळेना; १५० जोडपी प्रतीक्षेत, वर्षही उलटले
सोलापूर: आंतरजातीय विवाह करणार्या दीडशे जोडप्यांचे प्रोत्साहन अनुदान थकले आहे. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला असून, शासनाकडून अनुदान मिळावे, अशी मागणी आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांकडून होत आहे.
आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांना शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते. यामध्ये साठी जोडप्यापैकी वधू किंवा वर ही अनुसूचित जाती जमातीतील असली पाहिजे अशी अट आहे. अनुदानासाठी समाज कल्याण विभागाकडे अशा जोडप्यांनी रीतसर प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र गेल्या तीन वर्षापासून या अनुदानासाठी निधीच उपलब्ध नसल्यामुळे हे प्रोत्साहन पर अनुदान रखडले आहे. गेल्या वर्षी यासाठी 25 लाख रुपये उपलब्ध झाले होते यामधून जवळपास 50 जोडप्यांना या अनुदानाचे वाटप करण्यात आले मात्र उर्वरित 306 जोडप्यांचे प्रस्ताव अनुदानासाठी प्रलंबित आहेत.
अनुदानाबाबत पाठपुरावा सुरू असून शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास तात्काळ वितरित करण्यात येईल. आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांना शासनाकडून अनुदान येते. सध्या १५० जोडप्यांना अनुदान देणे बाकी आहे. निधी आल्यावर त्वरित अनुदान वाटप करण्यात येईल. - सुनील खमितकर , समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.